सानिया मिर्झा आणि वादविवादांचं नेहमीच सख्य राहिलं आहे. सातत्याने स्वत:भोवती वाद निर्माण होत असतानाही सानियाने दिमाखदार खेळासह आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत सानियाने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना महिला दुहेरीत जेतेपदावर नाव कोरले. वाद घडवणाऱ्या व्यक्तींपेक्षा पाठिंबा देणाऱ्या देशवासीयांचे प्रेम महत्त्वाचे आहे, असे मत टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केले.
अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी सानिया मिर्झाला प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र सानियाची या पुरस्कारासाठी निवड कशी झाली, अशी याचिका पॅराअ‍ॅथलिटपटूने दाखल केली होती. गेल्या वर्षीही या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी नवनिर्मित तेलंगण राज्याची सदिच्छादूत होण्याच्या मुद्दय़ावरून वादंग झाला होता. भारतीय जनता पक्षाच्या तेलंगणमधील नेत्याने सानियाला राज्याची सदिच्छादूत करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. वादाच्या पाश्र्वभूमीवर सानियाने मिश्र दुहेरीत ब्रुनो सोरेसच्या साथीने खेळताना जेतेपदाची कमाई केली होती.
वादांशी जोडले जाण्याबाबत विचारले असता सानिया म्हणाली, ‘‘मला अशा लोकांची पर्वा नाही. मी वृत्तपत्रे फारशी वाचत नाही. सर्वोत्तम कामगिरीसह टेनिस खेळण्याचा प्रयत्न करते. त्यातच मला आनंद मिळतो. माझ्या खेळात शिखरापर्यंत वाटचाल केल्याचे समाधान आहे. वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तींकडे मी लक्ष देत नाही. कारण बाकी देश माझ्या पाठीशी आहे, याची मला जाणीव आहे.’’
मार्टिना हिंगिससह पुढच्या वर्षीही खेळणार असल्याचे सानियाने स्पष्ट केले. मात्र मिश्र दुहेरीत ब्रुनो सोरेससह खेळणार की नाही, याविषयी साशंकता असल्याचे सानियाने सांगितले. अमेरिकन खुल्या स्पर्धेतील दिमाखदार कामगिरीबाबत सानिया म्हणाली, ‘‘आम्हाला अव्वल मानांकन देण्यात आले होते. मानांकनाला साजेसा खेळ करत जेतेपद पटकावले याचा आनंद आहे. हार्ड कोर्टवर खेळणे आम्हा दोघींनाही आवडते. प्रत्येक सामन्यागणिक आमच्या कामगिरीत सुधारणा झाली, म्हणूनच आम्ही जिंकू शकलो.’’
सानिया-मार्टिना जोडीने यंदाच्या हंगामात एकत्र खेळताना चार जेतेपदे जिंकली आहेत. बहुतांशी स्पर्धामध्ये किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्यात त्यांनी यश मिळवले आहे. या यशासह सानियाने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धेचे किमान एक जेतेपद पटकावले आहे. यासह राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसमध्ये भारताला पदकाची आशा आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत कोणासह खेळायचे यासंदर्भात निर्णय लवकरच होईल. मिश्र दुहेरीत भारताला पदकाची सर्वोत्तम संधी आहे. अजूनही ऑलिम्पिकला एक वर्ष आहे. सर्व खेळाडू आणि समीकरणांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल.