ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचे मत

‘विराट कोहली युवा खेळाडू आहे. एकदिवसीय प्रकारातील त्याचे प्रदर्शन अफलातून असेच आहे. यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामात चार शतकांसह त्याने झळकावलेल्या धावा सातत्यपूर्ण खेळाचे प्रतीक आहे. अद्भुत क्षमता असलेला प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याचा दृष्टिकोनही योग्य असाच आहे. देशाचे प्रतिनिधित्त्व करताना सातत्याने दिमाखदार प्रदर्शन कसे करायचे याची गुरुकिल्ली त्याला मिळाली आहे. मात्र कोहलीची महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी तुलना करू नये. दुर्दैवाने दुखापत किंवा धावा न होण्याचा कालखंड त्याच्याही कारकीर्दीत येऊ शकतो. त्यामुळे सचिनशी तुलना नको’, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियातील टास्मानिया राज्याचा सदिच्छादूत असलेला पॉन्टिंग यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होता.

विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, केन विल्यमसन, जो रूट या चौघांनाही भन्नाट सूर गवसला आहे. अव्वल संघांविरुद्ध ते सातत्याने धावा करत आहेत. चौकडीपैकी सर्वोत्तम कोण हे फारसे महत्त्वाचे नाही. या चौघांना खेळताना पाहणे आनंददायी आहे. वय लक्षात घेता विराटला किंचित आघाडी आहे. मात्र स्मिथ आणि विल्यमसनही फार मागे नाहीत. या चारजणांपैकी मानसिकदृष्टय़ा जो कणखर असेल तो सरशी साधेल असे पॉन्टिंगने स्पष्ट केले.

द्विस्तरीय कसोटी संरचनेविषयी विचारले असता पॉन्टिंग म्हणाला, ‘सर्वच प्रकारांना कालसुसंगत करण्यासाठी आवश्यक बदल करावेत असे माझे मत आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि दोन विभागीय स्पर्धाविषयी अनेकदा चर्चा झाली मात्र निर्णय झाला नाही. कसोटीपेक्षाही एकदिवसीय प्रकार धोक्याच्या स्थितीत आहे. त्यासाठी एकदिवसीय प्रकारात आवश्यक बदल होणे गरजेचे झाले आहे’.

अनिल कुंबळेसारख्या दिग्गज खेळाडूची प्रशिक्षकपदी नियुक्ती भारतीय संघासाठी सकारात्मक गोष्ट आहे. खेळाडू आणि कर्णधार म्हणून यशस्वी कारकीर्द त्याच्या नावावर आहे. त्याचे खेळाविषयीचे ज्ञान प्रचंड आहे. खेळाडूंनी त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

कोहलीने कसोटी, एकदिवसीय तसेच ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारांत कर्णधारपद सोपवण्यासंदर्भात विचारले असता पॉन्टिंग म्हणाला, हा निर्णय बीसीसीआयचा आहे. महेंद्रसिंग धोनी तंदुरुस्त आहे. सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. कर्णधारपद भूषवण्याची त्याची इच्छा आहे. मात्र तिन्ही प्रकारात कर्णधारपद सांभाळणे जिकिरीचे असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या स्टीव्हन स्मिथकडे अशी जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी प्रचंड आव्हानात्मक आहे.