भारताची कर्णधार मिताली राजची मागणी

आयसीसी महिला विश्वचषक स्पध्रेतील कौतुकास्पद कामगिरीनंतर भारताची कर्णधार मिताली राजने पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे महिलांनाही समान आदर आणि आर्थिक लाभ मिळायला हरकत नसल्याची आशा व्यक्त केली आहे. विश्वचषक स्पध्रेचे उपविजेतेपद देशातील महिला क्रिकेटला सकारात्मक कलाटणी देणारे ठरेल, असेही तिने नमूद केले.

‘‘आम्ही असाधारण कामगिरी केली आहे आणि या कामगिरीने भारतातील महिला क्रिकेटला वेगळ्या टप्प्यावर नेले आहे, याची मला खात्री आहे,’’ असे मिताली म्हणाली. लंडनमधील भारतीय उच्चायुक्त वाय. के. सिन्हा यांच्याकडून भारतीय खेळाडूंचे विशेष आदरातिथ्य करण्यात आले, त्या वेळी मिताली बोलत होती.

ती म्हणाली, ‘‘महिला क्रिकेटला आता प्रत्येक जण वेगळ्या दृष्टिकोनाने पाहत आहेत आणि पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंना समान आदर आता मिळू लागला आहे. विविध ब्रँड्स खेळाडूंशी करार करण्यासाठी उत्सुक आहेत आणि हा आमच्यासाठी वेगळा अनुभव आहे. या खेळात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलीला याने मदत होईल. या व्यासपीठाच्या माध्यमातून भारतातील महिला क्रिकेटपटूंसाठी मजबूत पाया तयार करणार आहोत.’’

सुषमा वर्माला पोलीस उपाधिक्षकपद

भारतीय महिला क्रिकेट संघातील यष्टिरक्षक सुषमा वर्माला हिमाचल प्रदेश सरकारने पोलीस उपाधिक्षकपदाचा प्रस्ताव दिला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग म्हणाले की, ‘‘सुषमाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल राज्य सरकारला तिचा अभिमान वाटतो. तिला आम्ही पोलीस उपाधिक्षकपद देऊ इच्छितो.’’