पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर भारतातील राज्य क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूचे फोटो आपल्या स्टेडियममधून आणि मुख्यालयात हटवले. तसेच त्यानंतर अनेक क्रिकेट जाणकारांनी आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती. तर काहींनी पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा खेळ खेळू नये, असे मत व्यक्त केले होते. पण पाकिस्तानशी क्रीडासंबंध थांबवू नयेत, असे मत ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार याने व्यक्त केले आहे. नागपूरमध्ये एका आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उद्घटनाच्या वेळी सुशीलकुमार बोलत होता.

खेळ आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. खेळ हा मनं जोडणारा दुवा असतो. त्यामुळे पाकिस्तानशी क्रीडासंबंध थांबवण्यात येऊ नयेत. पाकिस्तान क्रिकेट संघाला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळू नये, यासाठी BCCI प्रयत्न करत आहे. पण असे असताना पुलवामा हल्ल्याचा खेळावर परिणाम होऊन देऊ नये, असे सुशीलकुमार म्हणाला.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाबद्दल मला सहानुभूती आणि आदर आहे. मात्र, या हल्ल्याचा परिणाम खेळावर होऊ नये असे मला वाटते. खेळ दोन देशांना जोडतो. युवकांना संधी देतो आणि संबंध सुधारतो. त्यामुळे क्रीडा संबंध थांबवणे मला अयोग्य वाटते, असे त्याने स्पष्ट केले.