कोणत्याही पिढीत महेंद्रसिंह धोनीसारखा एखादाच खेळाडू असतो. त्यामुळे धोनीच्या क्षमतेवर शंका घेऊन त्याला निवृत्तीसाठी भाग पाडू नका, असे आवाहन इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने केले आहे.

‘‘धोनीने क्रिकेटला अलविदा केल्यावर तो परतणार नाही. महान खेळाडू हा प्रत्येक पिढीत एखादाच जन्माला येत असतो. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची घाई करू नये. फक्त धोनीलाच त्याच्या मानसिक स्थितीची कल्पना आहे. अखेरीस निवड समिती खेळाडूची निवड करते आणि खेळाडूला सूचना करते,’’ असे ५२ वर्षीय हुसेनने सांगितले. जुलै महिन्यात ३९ वर्षांचा होणारा धोनी गतवर्षी एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये

पुनरागमन करणे धोनीला कठीण जाईल, असे मत भारतातील महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.

१९९९ ते २००३ या कालावधीत इंग्लंडचे नेतृत्व करणारा हुसेन म्हणतो, ‘‘धोनीकडे अद्याप भारतीय संघात स्थान मिळवू शकण्याची क्षमता आहे का? याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करू शकेल. माझ्या मते धोनी भारतीय संघात स्थान मिळवू शकतो,’’ असे हुसेनने सांगितले.

‘‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या डावाला गती देण्यात धोनी अपयशी ठरला होता. पण तरीही असामान्य गुणवत्ता असलेल्या धोनीशिवाय भारताला पर्याय नाही,’’ असे विश्लेषणसुद्धा हुसेनने यावेळी केले.