भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने, आशिया चषकाच्या व्यस्त वेळापत्रकावर कठोर शब्दात टीका केलेली आहे. यंदाचा आशिया चषक दुबई आणि अबुधाबी शहरात खेळवला जाणार आहे. १५ सप्टेंबरपासुन सुरु होत असलेल्या स्पर्धेत भारताला १८ आणि १९ सप्टेंबररोजी लागोपाठ दोन सामने खेळायचे आहेत. १९ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. तर १८ सप्टेंबररोजी भारताचा प्रतिस्पर्धी अजुन ठरायचा आहे. मात्र हे वेळापत्रक भारतीय खेळाडूंसाठी दमवणारं असल्याचं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

“आशिया चषक स्पर्धेचं वेळापत्रक पाहून मला धक्काच बसला. सध्याच्या घडीला कोणता संघ लागोपाठ वन-डे क्रिकेट खेळतो?? इंग्लंड दौऱ्यात तुम्ही टी-२० सामन्यांमध्ये दोन दिवसांची विश्रांती ठेवलीत, आणि दुबईत तुम्ही एकही दिवसाची विश्रांती न घेता सलग दोन सामन्यांचं आयोजन करता?? हे वेळापत्रक अत्यंत चुकीचं आहे.” India TV ला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने आपलं मत मांडलं.

“आशिया चषकाचा इतका बाऊ का केला जातोय? इतक्या व्यस्त वेळापत्रकात खेळण्याऐवजी भारतीय संघाने सरळ आशिया चषकातून माघार घ्यावी. कोणत्याही खेळाडूसाठी लागोपाठ सामने खेळणं हे अत्यंत कठीण असतं. या ऐवजी भारताने मायदेशातील आणि परदेशात खेळवल्या जाणाऱ्या मालिकांची तयारी करावी. सेहवागने आपलं कठोर मत व्यक्त केलं. या व्यस्त वेळापत्रकामुळे पाकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी भारतीय खेळाडू थकण्याची शक्यता आहे. असं झाल्यास याचा फायदा पाकिस्तानच्या संघाला होण्याची शक्यता आहे. याचसोबत या स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्यामधून सावरणंही कठीण होऊन बसेल.” स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्न निर्माण करत सेहवागने भारतीय संघाला महत्वाचा सल्ला दिला आहे.