करोना विषाणूच्या तडाख्यामुळे गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. भारतीय संघाचा कसोटी दौरा डिसेंबरमध्ये नियोजित आहे, त्यासाठी आतापासून चर्चा सुरू झाली आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका ३ डिसेंबर ते ७ जानेवारी या काळात रंगणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू हे मैदानावर स्लेजिंगसाठी ओळखले जातात. पण यंदा मात्र भारतीय कर्णधार विराट कोहलीला अजिबात स्लेजिंग करून असा सल्ला डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियन सहकाऱ्यांना दिला आहे.

“तुम्ही जेव्हा प्रेक्षकांकडे पाहून ओरडता, तेव्हा प्रेक्षक तुमच्या हजारपटीने मोठ्या आवाजात ओरडतात. विराटदेखील तसाच आहे. तुम्ही जर विराटच्या दिशेने एक पाऊल जाल, तर तो त्वेषाने तुमच्या अंदावर चाल करून येईल. त्याचं त्वेषाने चाल करून येणं म्हणजे बॅटने समोरच्या गोलंदाजांना झोडपून काढणं. तो एक अप्रतिम फलंदाज आहे आणि त्याला डिवचण्याचे परिणाम आम्ही अनेकदा पाहिले आहेत. त्यामुळे उगाच अस्वलाला गुदगुल्या करून स्वत:वर संकट ओढवून घेण्यात काहीच अर्थ नाही”, असं डेव्हिड वॉर्नर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारताचा ‘कसोटी स्पेशालिस्ट’ माजी फलंदाज राहुल द्रविड याने भारतीय संघाला एक ‘वॉर्निंग’ दिली. “स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांशिवाय खेळणं ऑस्ट्रेलियासाठी खूप कठीण होतं. कारण ते त्यांचे महत्त्वाचे दोन फलंदाज होते आणि ऑस्ट्रेलियासाठी या दोघांनी खूप धावा केल्या आहेत. त्यांचं कसोटी संघात पुनरागमन झाल्यानंतर काय घडलं ते आपण साऱ्यांनी पाहिलं आहे. स्मिथ-वॉर्नर जोडी खूप घातक आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघापुढे त्या दोघांचं मोठं आव्हान असेल”, अशी चेतावणी द्रविडने टीम इंडियाच्या शिलेदारांना दिली आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी – ३ ते ८ डिसेंबर (ब्रिसबेन)
दुसरी कसोटी (दिवस-रात्र) – ११ ते १५ डिसेंबर (अ‍ॅडलेड ओव्हल)
तिसरी कसोटी (बॉक्सिंग डे) – २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी (सिडनी)