आयपीएलच्या तेराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने बाजी मारल्यानंतर सोशल मीडियावर भारतीय संघाला नेतृत्वबदलाची गरज असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका गमावल्यानंतर या चर्चेने आणखी जोर धरला. अनेक माजी खेळाडूंनीही विराटने भारताच्या वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपद रोहितकडे सोपवावं अशी मागणी केली आहे. परंतू माजी कसोटीपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्मणच्या मते सध्या भारतीय संघाला नेतृत्वबदलाची गरज नाहीये.

“रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे यात काही वादच नाही. विराटच्या अनुपस्थितीत त्याने ज्या-ज्या वेळी भारतीय संघाचं नेतृत्व केलंय तेव्हा तो यशस्वी झालाय. एखाद्या संघाला पाच विजेतेपद मिळवून देणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्याने मुंबईच्या संघाचं खूप चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलं आहे. पण दुसऱ्या बाजूला विराट कोहलीही चांगली कामगिरी करतो आहे, त्यामुळे सध्या भारतीय संघाला नेतृत्वबदलाची गरज आहे असं मला वाटत नाही.” रोहित शर्माच्या कारकिर्दीवर लिहीण्यात आलेल्या पुस्तकाच्या व्हर्च्युअल प्रकाशन सोहळ्यादरम्यान लक्ष्मण बोलत होता.

आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या वन-डे आणि टी-२० संघात स्थान मिळालं नाही. सध्या रोहित NCA मध्ये आपला फिटनेस सुधारण्याकडे लक्ष देतो आहे. ११ डिसेंबरला रोहितची फिटनेस चाचणी होणार असून यानंतर तो कसोटी मालिकेत सहभागी होईल की नाही याचा निर्णय घेतला जाईल.