विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब सुरुवात झाली. सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला अष्टपैलू खेळाडूची मोठी उणीव भासली. हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे फिट नसल्यामुळे भारतीय संघाला पाच गोलंदाजांच्या जोरावर काम करावं लागलं. टीम इंडियाला सध्याच्या घडीला एका अष्टपैलू गोलंदाजाची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने, या संघाच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकणार नाही असं परखड मत मांडलं आहे.

“सध्याच्या घडीला भारतीय संघाला किमा ६-७ गोलंदाजीचे पर्याय हवे आहेत. जर मी भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये असतो तर सर्वात आधी अतिरीक्त गोलंदाज याकडे लक्ष दिलं असतं. फलंदाजीत अखेरच्या फळीतही टीम इंडियाला चांगल्या पर्यायांची गरज आहे. मला कल्पना आहे की विश्वचषक स्पर्धा आता खूप लांब आहे, परंतू या संघाच्या जोरावर भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असं मला वाटत नाही.” मायकल वॉन Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. अशावेळी भारतीय संघाला हार्दिक पांड्याची गरज होती. परंतू पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक सध्या गोलंदाजी करु शकत नाहीये. त्यामुळे विराटला आपल्याकडे असलेल्या पर्यायांवर अवलंबून रहावं लागतंय. महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला सामना गमावूनही विराटने दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणतेही बदल केले नाहीत.