ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला नमवून तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारत ‘अ’ संघाचा कप्तान चेतेश्वर पुजाराच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. परंतु आगामी मालिकेत महेंद्रसिंग धोनीच्या वरिष्ठ भारतीय संघाला अशाच प्रकारची खेळपट्टी मिळेल अशी अपेक्षा करू नये, असा सल्ला पुजाराने दिला आहे.
‘‘आम्ही दक्षिण आफ्रिकेत पुन्हा खेळायला जेव्हा येऊ, तेव्हा अशाच प्रकारचे वातावरण उपलब्ध असेल, अशी अपेक्षा मी नक्कीच करणार नाही. याक्षणी खेळपट्टय़ा सपाट आहेत. परंतु डिसेंबपर्यंत परिस्थिती पूर्णत: बदललेली असेल, याची आम्हाला जाणीव आहे. फक्त खेळपट्टीच नव्हे तर हवामान आणि खेळासंदर्भातील महत्त्वाच्या आणखीसुद्धा काही गोष्टी बदलल्या असतील,’’ असे पुजाराने सांगितले.
‘‘भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एका सामन्यात आठशेहून अधिक धावा झाल्या होत्या. सामने मोठय़ा धावसंख्येचे झाले. त्यामुळे गोलंदाजांच्या योजना आखणे अतिशय कठीण जायचे,’’ असे पुजाराने सांगितले.