ऑस्ट्रेलियाचा ख्यातनाम माजी फिरकीपटू शेन वॉर्नने सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली हा चांगला फलंदाज असल्याचे मत मांडले आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीने ठोकलेल्या शतकांचा विचार करता सचिन तेंडुलकरलाही कोहलीसारखी कामगिरी करता आली नसती, असेही शेन वॉर्नने म्हटले आहे.

आयपीएलमध्ये शेर्न वॉर्न सध्या राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर असून भारतीय क्रिकेटबाबत शेन वॉर्नने त्याचे मत मांडले. विराट कोहलीच्या खेळीने वॉर्न प्रभावित झाला आहे. वॉर्न म्हणतो, कोहलीचा खेळ आणि धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने ठोकलेल्या शतकांचा आकडा पाहता विराट कोहलीसारखी खेळी करणे कोणालाही शक्य होणार नाही. इतकंच काय, सचिन तेंडुलकरलाही अशी खेळी करणे शक्य झाले नसते, असे वॉर्नने म्हटले आहे. सचिन आणि ब्रायन लारा हे आमच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाज होते. पण विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची खेळण्याची पद्धतच वेगळी आहे. कोहलीमधील उर्जा आणि पॅशन मला भावते. दहा वर्षांनी निवृत्त होताना कोहलीचे नाव सचिनसारखेच आदराने घेतले जाईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

कोहलीच्या नेतृत्वगुणाचेही वॉर्न कौतुक करतो. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीच्या संघाचे पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियापूर्वी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यात भारत बाजी मारेल, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येताना टीम कोहलीचा आत्मविश्वास वाढलेला असेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. मला कोहलीला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील खेळपट्टीवर फलंदाजी करताना बघायला आवडेल, असेही त्याने सांगितले. अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ एक कसोटी सामना खेळणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त कसोटी सामने खेळले पाहिजे. पण कोहलीने कौंटी क्रिकेटला प्राधान्य देऊन इंग्लंड दौरा त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले, असे वॉर्नने नमूद केले.

यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आल्यावर त्यांचे जलदगती गोलंदाज प्रभावी कामगिरी करत नव्हते. पण आता चित्र बदलले आहे. आता त्यांच्याकडे फिरकीच्या जोडीला दर्जेदार जलदगती गोलंदाजही आहेत, असेही वॉर्नने स्पष्ट केले.