भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी खेळाचे तंत्र आणि मंत्र जाणून घेऊन आता अनेक देशांचे संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघ आता कोणत्याही संघाला कमी लेखू शकत नाही. परंतु आशियाई क्रीडा स्पध्रेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकू, असा विश्वास भारतीय कबड्डी संघाची कर्णधार तेजस्विनी बाई हिने व्यक्त केला. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत भारतीय रेल्वेने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे आणि तेजस्विनीचा या यशात सिंहाचा वाटा आहे. २०११मध्ये अर्जुन पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या तेजस्विनीशी केलेली खास बातचीत –
*आशियाई क्रीडा स्पध्रेची भारताची तयारी कशी सुरू आहे?
भारतीय रेल्वेच्या प्रशिक्षक नीता दडवे आणि सेनादलाच्या ई. भास्करन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘साई’ केंद्रांमध्ये आमची अनेक सराव शिबिरे झाली. या शिबिरांमध्ये तंदुरुस्तीवर मेहनत घेण्यात आली. आता भोपाळमध्ये आमचे अखेरचे सराव शिबीर चालू असून यामध्ये संघरचनेवर भर दिला जात आहे. दक्षिण कोरियामध्ये या स्पध्रेच्या कालखंडात खूप थंडी असेल. त्यामुळे आम्ही हवामानाचा विचार करूनच सराव सत्रांमध्ये तयारी केली आहे.
*भारतासमोर महिला गटात कोणत्या संघांचे विशेष आव्हान असेल?
इराण आणि दक्षिण कोरियाच्या संघांचे भारतासमोर तगडे आव्हान असेल. कोरियाचा संघ भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आता चांगला तयार झाला आहे. परंतु आमची अंतिम लढत इराणशीच होण्याची दाट शक्यता आहे.
*पुढील वर्षी महिलांसाठीही प्रो-कबड्डी लीग होणार आहे. याविषयी किती उत्सुकता आहे?
आम्ही सर्वच महिला खेळाडू प्रो-कबड्डी लीगची आतुरतेने वाट पाहात आहोत. या वर्षी आम्ही पुरुषांच्या प्रो-कबड्डीच्या सामन्यांचा यथेच्छ आनंद लुटला. ही स्पर्धा अतिशय यशस्वी ठरली. पावणेआठलाच आम्ही टीव्हीसमोर बसायचो. अतिशय रोमहर्षक सामने या लीगमध्ये पाहायला मिळाले.
*प्रो-कबड्डीमधील काही नियम लवकरच बाकीच्या स्पर्धामध्ये अमलात येण्याची शक्यता आहे. याबाबत तुझे मत काय आहे?
प्रो-कबड्डीमधील थर्ड रेड, सुपर कॅच आणि वेळेचे बंधन असलेल्या चढाया यांसारख्या काही नियमांमुळे सामने अतिशय रंगतदार आणि वेगवान झाले. यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा तरी प्रचलित नियमांनुसारच होणार आहे. पण लवकरच या नियमांची अंमलबजावणी होऊ शकेल.
*गेली अनेक वष्रे राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत भारतीय रेल्वेची मक्तेदारी टिकून आहे, याचे रहस्य काय आहे?
मुख्य प्रशिक्षक रणधीर सिंग यांच्या मार्गदर्शनामुळेच भारतीय रेल्वेला हे यश मिळवता आले आहे. त्यांचे मार्गदर्शन करण्याची शैली अतिशय छान आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडेही ते लक्ष देतात.