सांगली : ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी उत्तेजक चाचणी घेण्यात येणार असल्याचे राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी सांगितले. यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २ ते ७ जानेवारी दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘‘राज्य पातळीवरील ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा पुण्यात होणार असून कुस्तीमध्येही उत्तेजक पदार्थ सेवन केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे यंदाच्या स्पर्धेवेळी स्पर्धकांची उत्तेजक चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा शनिवार व रविवारी सांगलीवाडी येथील चिंचबाग मदानात होणार आहे,’’ असे मोहिते यांनी सांगितले.