गौरव राणा आणि अनमोल जैन यांनाही पदक

कनिष्ठ विश्वचषक  नेमबाजी स्पर्धा

भारतीय नेमबाजी क्षेत्राला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. त्यांच्या मनू भाकेरने वैयक्तिक व सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले, तर गौरव राणा व अनमोल जैन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवत कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. पुरुषांच्या सांघिक विभागामध्येही भारताला सुवर्णपदक मिळाले

१६ वर्षीय मनूने मेक्सिकोत नुकत्याच झालेल्या वरिष्ठ जागतिक स्पर्धेत पदार्पण करताना दोन सुवर्णपदके जिंकली होती. तीच विजयी मालिका पुढे ठेवत मनूने येथे १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदकजिंकले. तिने २३५.९ गुणांची नोंद करीत थायलंडच्या कन्याकोर्न हिरुंपोहेमला पराभूत केले. कन्याकोर्नने २३४.९ गुणांची कमाई केली. शेवटच्या नेमच्या वेळी मनूने कन्याकोर्नला मागे टाकण्यात यश मिळवले. चीनच्या केईमन लिऊला कांस्यपदक मिळाले. भारताच्या देवांशी राणानेदेखील अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मनू, देवांशी व महिमा अगरवाल यांनी सांघिक विभागात सुवर्णपदकाची कमाई केली. चीन व थायलंड यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले.

पुरुषांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात गौरवने २३३.९ गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर कांस्यपदक मिळवणाऱ्या अनमोलने २१५.१ गुणांची नोंद केली. चीनच्या झेहाहो वांगने २४२.५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. भारताच्या अर्जुनसिंग चीमा, अनहद जवांदा व अभिषेक आर्य यांनी अनुक्रमे ६ ते ८ क्रमांक मिळवले. चीमा, गौरव व अनमोल यांनी भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले. चीनला रौप्यपदक मिळाले. भारताच्याच जवांदा, आर्य व आदर्श सिंग यांनी सांघिक विभागाचे कांस्यपदकही जिंकले.

भारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाच सुवर्णपदकांसह पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. चीन संघ १३ पदकांसह आघाडीवर आहे.