राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना खात्री
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू पदकाचा दुहेरी आकडा गाठतील, असा विश्वास आहे. त्याचबरोबर जगज्जेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकाची दावेदार आहे, असे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जगातील प्रतिष्ठेच्या क्रीडा सोहळ्यासाठी भारताचे १२०पेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत. ‘‘या वेळी भारताची पदकतालिकेतील कामगिरी नक्कीच सुधारलेली असेल. लंडनमध्ये भारताने सर्वाधिक सहा पदके मिळवली होती. आता यंदा तो आकडा १०च्या वर गेलेले असेल. भारतीय सरकारकडून खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. सरकारच्या पाठबळामुळेच खेळाडूही अधिकाधिक पदकांची भर घालतील,’’ असा विश्वास गोपीचंद यांनी व्यक्त केला.

‘‘नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला पदकाची संधी आहे. त्याचबरोबर भारतीय बॅडमिंटनपटूंनाही आपली कामगिरी सुधारण्याची खूप चांगली संधी आहे. रिओ आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने जे यश साध्य केले, त्यापेक्षा चांगले यश मिळवण्याची संधी आहे. सिंधू ही सुवर्णपदकाची दावेदार समजली जात आहे. चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी यांच्यासमोरही खडतर प्रतिस्पध्र्यांचे आव्हान नसेल. त्यांच्यातही पदक जिंकण्याची क्षमता आहे. बी. साईप्रणीतसाठी मात्र पदक जिंकणे सोपे नसेल. पण त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याच्याकडून अशाच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे,’’ असेही गोपीचंद म्हणाले.

 

उद्घाटन सोहळ्याला सहा अधिकाऱ्याना परवानगी

’ भारतीय पथकातील फक्त सहा पदाधिकाऱ्याना शुक्रवारी रंगणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहता येणार आहे. मात्र खेळाडूंच्या संख्येबाबत कोणतीही अट ठेवण्यात आली नाही, असे भारताचे उपपथकप्रमुख प्रेमकुमार वर्मा यांनी सांगितले. ‘‘प्रत्येक देशाच्या सहा पदाधिकाऱ्यानाच उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण पुढील दिवशी ज्या खेळाडूंना स्पर्धेत उतरावयाचे आहे, त्यांनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे आणि उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊ नये, असा सल्ला आम्ही दिला आहे,’’ असे वर्मा यांनी सांगितले. भारताचा १२७ खेळाडूंसह २२८ जणांचा चमू टोक्योसाठी दाखल झाला आहे.

भारतीय टेबल टेनिसपटूंपुढे खडतर आव्हान

’ ऑलिम्पिकमध्ये भारतीय टेबल टेनिसपटूंना खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शरथ कमाल आणि मनिका बत्रा या भारताच्या जोडीला चायनीज तैपेईच्या तिसऱ्या  मानांकित लिन यून-जू आणि चेंग आय-चिंग यांच्याशी लढत द्यावी लागेल. पुरुष दुहेरीत शरथ आणि जी. साथियन यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. शरथने एकेरीत तिसऱ्या फेरीत वाटचाल केल्यास, त्याला चीनच्या रिओ ऑलिम्पिक विजेत्या मा लाँग याच्याशी लढत द्यावी लागेल.