अपेक्षेप्रमाणे डी.वाय.पाटील क्रीडा अकादमीचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदासाठी पाटील यांचा एकमेव अर्ज आला असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट मानलं जात होतं. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले. सचिव पदावर संजय नाईक तर उपाध्यक्ष पदावर अमोल काळे यांची निवड झालेली आहे.

क्रिकेट फर्स्ट गटाकडून विजय पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला होता. यानंतर बाळ महाडदळकर गटाने पाटील यांना अध्यक्षपदासाठी पाठींबा दिला. याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजय पाटील यांना शरद पवारांच्या हस्ते पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर लोढा समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसींमुळे शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे देखील यंदाच्या निवडणुकांमध्ये उतरणार होते, मात्र परस्पर हितसंबंधांचा मुद्दा मध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे पाटील यांनी माघार घेतली.

अशी असेल मुंबई क्रिकेट असोसिएशनची नवीन कार्यकारणी –

  • अध्यक्ष – डॉ. विजय पाटील (बिनविरोध)
  • उपाध्यक्ष – अमोल काळे (बिनविरोध)
  • सचिव – संजय नाईक (बिनविरोध)
  • संयुक्त सचिव – शाहलम शेख
  • खजिनदार – जगदीश आचरेकर

कार्यकारी सदस्य मंडळ –

उन्मेश खानविलकर, अजिंक्य नाईक, गौरव पय्याडे, विहंग सरनाईक, अभय हडप, कौशिक गोडबोले, अमित दाणी, नदीम मेमन, खाझदेगर्दी खोदादाद