नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून राहुल द्रविडने आपली ओळख निर्माण केली होती, तशीच ओळख सध्याच्या पिढीतील कसोटी क्रिकेटपटूंमध्ये चेतेश्वर पुजाराने केली आहे. पुजारा हा नेहमीच द्रविडला त्याचा आदर्श मानतो. क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ करू नकोस, दोन्ही गोष्टी भिन्न ठेव, असा सल्ला द्रविडने दिला होता आणि मी त्याप्रमाणेच वागतो, असे पुजाराने म्हटले आहे.

‘‘वैयक्तिक आयुष्य जगताना क्रिकेटपासून कसे थोडा काळ दूर राहावे, याचे महत्त्व द्रविडने शिकवले. सुरुवातीपासून मी क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्य हे कधीही एकमेकांमध्ये आणू दिले नाही. त्यातच द्रविडच्या मार्गदर्शनानंतर मला क्रिकेट आणि माझे कुटुंबासोबतचे आयुष्य वेगळे ठेवण्यास मदत झाली,’’ याकडे पुजाराने लक्ष वेधले.

तो म्हणाला की, ‘‘राहुल द्रविड माझ्यासाठी काय आहेत, हे शब्दात सांगता येणार नाही. द्रविड माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च आदर्श असणार आहेत. माझी अनेक वेळा फलंदाजीबाबतीत आणि खेळताना संयम ठेवण्याबाबतीत द्रविडशी तुलना करण्यात येते. पण द्रविड आदर्श असल्याने त्याच्या खेळाचा कित्ता गिरवलेला नाही. फक्त फलंदाजीत शतक पुरेसे नाही तर संघाची बाजू एकाबाजूने सावरणे गरजेचे आहे, हे सौराष्ट्राकडून खेळताना शिकलो. त्यामुळेच जबाबदारी निभावता येते,’’ असे पुजाराने सांगितले.