इंग्लंडचा माजी तडाखेबंद फलंदाज केव्हिन पीटरसनने आपल्या आत्मचरित्रामधून संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंवर टीकेची झोड उठवली आहे, परंतु भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला गुरुस्थानी मानले आहे. द्रविडला त्याने आत्मचरित्रामध्ये कुर्निसात करत त्याच्याकडून बरेच काही शिकल्याचेही कबूल केले आहे.
पीटरसनचे आत्मचरित्र वादग्रस्त असल्याचे म्हटले जात होते, पण द्रविडला त्याने कुर्निसात केल्यावर मात्र त्याच्या आत्मचरित्राकडे बघण्याची दृष्टी बदलल्याचे म्हटले जात आहे.
आत्मचरित्रामध्ये पीटरसनने म्हटले आहे की, ‘‘राहुल हा एक महान फलंदाज होता. फिरकी गोलंदाजी तो आरामात खेळायचा.  द्रविडने सुसंवादामधून व ई-मेल्सद्वारे माझी शिकवणी घेतली. द्रविडमुळे माझ्या खेळामध्ये सुधारणा झाली. त्याने मला शिकवण्याचे कायम औदार्य दाखवले. तुला चेंडूवर लक्ष देण्याची आणि स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तू फिरकी गोलंदाजी खेळू शकत नाही, असे कोणाला बोट दाखवायला जागा देऊ नकोस. असे त्याने मला मार्गदर्शन केले होते.’’