अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकापेक्षा पाचव्या क्रमांकाला अधिक समर्थपणे न्याय देऊ शकतो, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत रहाणेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया लि. प्रकाशन आणि ईएसपीएन-क्रिकेट इन्फो यांच्यातर्फे आकाश चोप्रा लिखित ‘द इनसायडर’ या पुस्तकाचे शुक्रवारी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात प्रकाशन झाले. यावेळी रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या की पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी, याबाबत विचार मांडताना द्रविड म्हणाला, ‘‘रहाणे पाचव्या क्रमांकावर उत्तम फलंदाजी करून शकेल किंवा चौथा क्रमांकसुद्धा त्याला समर्पक ठरेल. तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन चिवटपणे फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याचे फटके निवडण्याची पद्धती ही या क्रमांकाला साजेशी आहे. याचप्रमाणे दुसऱ्या नव्या चेंडूला सामोरे जाण्याची संधी त्याला मिळेल.’’
‘‘आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचा विचार केल्यास शिखर धवन आणि मुरली विजय दुखापतीतून सावरत सलामीला उतरतील. याशिवाय लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा हे फलंदाज संघात असतील. या फलंदाजांचे क्रम लावणे, हे आव्हानात्मक ठरणार आहे,’’ असे द्रविडने सांगितले.
रहाणेने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यांवर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर गॉलच्या पहिल्या कसोटीत तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. पण भारताने ती कसोटी गमावली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि भारताने या दोन्ही कसोटींसह मालिका २-१ अशी जिंकली. दुसऱ्या कसोटीत रहाणेने शतक झळकावले, मात्र अन्य तिन्ही डावांत त्याला दोन आकडी धावसंख्या साकारता आली
नव्हती.
मुंबईकर फलंदाज रोहित शर्मा मालिकेतील पहिल्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरला. मात्र पाचव्या क्रमांकावर उतरून त्याने दोन अर्धशतके केली.
१६४ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या द्रविडने रहाणे आणि आपल्यातील साम्य मुद्दे मांडताना सांगितले की, ‘‘आम्ही दोघांनाही भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी चार-पाच वष्रे वाट पाहावी लागली. त्याआधी ६०हून अधिक धावांच्या सरासरीने आम्ही स्थानिक क्रिकेटमध्ये धावा काढल्या होत्या. रहाणेच्या फलंदाजीच्या भात्यात माझ्यापेक्षा अधिक वैविध्यपूर्ण फटके आहेत. गेल्या काही मालिकांमध्ये रहाणेने परदेशातील मैदानावर समर्थपणे फलंदाजी करू शकणारा एक चांगला फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. खूप चांगली क्षमता असलेला हा गुणवान फलंदाज आहे.’’
दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीचा आम्ही समर्थपणे सामना करू -रहाणे
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजीचा समर्थपणे सामना करू शकले नव्हते. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत फिरकी गोलंदाजीचा आम्ही आत्मविश्वासाने मुकाबला करू, असे आश्वासन अजिंक्य रहाणेने दिले.
‘‘आम्ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजी उत्तमपणे खेळलो. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दुर्दैवाने आम्हाला फिरकी गोलंदाजी खेळण्यात अपयशी ठरलो. या पाश्र्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आम्ही फिरकी गोलंदाजांविरुद्धची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करू,’’ असे रहाणेने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘आम्ही फिरकी गोलंदाजी वाईट पद्धतीने खेळलो, असे मला वाटत नाही. श्रीलंकेत रंगना हेराथ आणि थरिंदू कौशल यांनी चांगली गोलंदाजी केली आणि याचे श्रेय त्यांना द्यायला हवे.’’
द्रविडने चांगला क्षेत्ररक्षक म्हणून मला घडवले. त्यामुळेच सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम साकारू शकलो, असे रहाणेने सांगितले. ‘‘मी जगातील एका सर्वोत्तम स्लिपमधील क्षेत्ररक्षकासोबत खेळलो आहे, याचा मला फायदा झाला. क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकासोबत मी दिवसाला ५०-१०० झेल घेण्याचा सराव करतो. याची मला मदत होते. संयम, शांतपणा आणि पूर्वानुमान हे स्लिपमधील चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी आवश्यक गुणधर्म आहेत,’’ असे रहाणेने सांगितले.