शेन वॉर्न आणि राहुल द्रविड या राजस्थान रॉयल्सच्या दोन्ही महान कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी अजिंक्य रहाणेला मिळाली आहे. ‘‘द्रविड आणि वॉर्न हे दोघेही महान आहेत. पण दोघांची नेतृत्वशैली वेगवेगळी आहे. संघाचे नेतृत्व सांभाळताना द्रविड सर्व गोष्टी सहजपणे हाताळत असतो. पण वॉर्नचे तसे नाही. तो प्रत्येक वेळी नव्या कल्पक गोष्टी अमलात आणत असतो. पण त्याचे हे प्रयोग प्रत्येक वेळी यशस्वी होतातच असे नाही,’’ असे रहाणेने सांगितले.
दोन्ही कर्णधारांकडून काय शिकायला मिळाले, असे विचारले असता तो म्हणाला, ‘‘शेन वॉर्नकडून मला भरपूर काही शिकायला मिळाले, पण द्रविड आणि वॉर्न या दोघांनीही मला मोलाचे मार्गदर्शन केले. माझे नाव उच्चारणे वॉर्नला कठीण जात असल्यामुळे तो मला ‘जिंक्स’ या नावाने हाक मारायचा तर द्रविड मला ‘अज्जू’ म्हणून हाक मारायचा.’’