मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यापासून कॉमेंट्री पॅनलमधून आपलं स्थान गमावून बसलेल्या संजय मांजरेकरांना आयपीएलमध्येही बीसीसीआयने संधी दिली नाही. आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे चर्चेत असलेल्या मांजरेकरांवर बीसीसीआयमधील काही अधिकारी हे नाराज होते. परंतू भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून संजय मांजरेकर कॉमेंट्री पॅनलमध्ये पुनरागमन करणार असल्याचं समजतंय. मुंबई मिरनने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहेत. संजय मांजरेकर यांच्यासोबतच सुनिल गावसकर, हर्षा भोगले ही मंडळीही कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत. तर विरेंद्र सेहवाग हा हिंदी कॉमेंट्रीत दिसणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क हे सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाकडे आहेत. त्यामुळे कॉमेंट्री पॅनल ठरवताना बीसीसीआय त्यात आपली बाजू मांडू शकत नाही. याच कारणामुळे मांजरेकर यांना कॉमेंट्री पॅनलमध्ये संधी दिली आहे. नवीन वर्षात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यावेळी बीसीसीआय संजय मांजरेकर यांना पुन्हा एकदा कॉमेंट्री पॅनलच्या बाहेर ठेवू शकतो.

बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये असताना भारतीय खेळाडूंवर केलेली टीका, हर्षा भोगले यांच्यासोबत रंगलेला वाद या सर्व गोष्टींमुळे बीसीसीआयमधील अधिकारी मांजरेकरांवर नाराज होते. आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधी संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयला इ-मेल करत आपल्याला कॉमेंट्री पॅनलमध्ये संधी देण्याची मागणी केली होती. परंतू बीसीसीआयने त्यांच्या या मागणीचा विचार केला नव्हता.