दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा फॅफ ड्युप्लेसिस अशा प्रकारे दोषी आढळला आहे. मात्र तरीही फॅफ ड्युप्लेसिस ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दिवस-रात्र चालणाऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार आहे.

ऍडलेड ओव्हलवर तीन तास चाललेल्या सुनावणीनंतर आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी चेंडूशी केलेल्या छेडछाड प्रकरणात ड्युप्लेसिस दोषी असल्याचे म्हटले. यानंतर ड्युप्लेसिसच्या सामन्याच्या मानधनातील १०० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली. आयसीसीच्या आचारसंहितेच्या अंतर्गत ड्युप्लेसिसवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या होबार्ट कसोटी सामन्यात चेंडूला चकाकी देण्यासाठी तोंडातील च्युइंगमच्या रसाचा जाणीवपूर्वक वापर करून चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप फॅफ ड्युप्लेसिसवर ठेवण्यात आला होता. याआधी २०१३ मध्येही ड्युप्लेसिस चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. त्यावेळी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडू पँटच्या खिशाला असणाऱ्या झिपला घासल्याप्रकरणी ड्युप्लेसिस दोषी आढळला होता. आयसीसीच्या नियमावलीमध्ये सप्टेंबरमध्ये बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमावलीनुसार होबार्टमधील घटनेला ड्युप्लेसिसचा पहिला गुन्हा समजण्यात आले आहे.

सचिन-द्रविडसह हे क्रिकेटर चेंडूशी छेडछाड केल्यामुळे चर्चेत आले होते!

फॅफ ड्युप्लेसिसने कसोटी सामन्यादरम्यान बॉलला चकाकी देताना तोंडातील च्युइंगमच्या रसाचा जाणीवपूर्वक वापर करत चेंडूसोबत छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात होता. याचा व्हिडिओ देखील जारी करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ड्युप्लेसिस बॉलला झळाळी देताना सारखा थुंकीचा वापर करताना दिसत होता. मात्र, त्याचवेळी ड्युप्लेसिसच्या तोंडात च्युइंगम असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसले. त्यामुळे च्युइंगमच्या रसाची मदत घेऊन ड्युप्लेसीसने बॉलला चकाकी देऊन छेडछाड केल्याच्या बातम्या ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रात छापून आल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱया डावात ५ बाद १५० धावांवर खेळत असताना सामन्याच्या ५४ व्या षटकात ड्युप्लेसिसने गोलंदाज रबाडा याला चेंडू देण्यापूर्वी चेंडूला चकाकी देताना थुंकीचा वारंवार वापर केला. यात तो चळघळत असलेल्या च्युइंगमचीही मदत घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. विशेष म्हणजे, याप्रकारानंतर पुढच्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर बाद झाला होता.

होबार्ट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या ८५ धावांवर संपुष्टात आला होता. यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३६१ धावा केल्या. पहिल्या डावात आफ्रिकेला २४१ धावांची आघाडी मिळाली होती. क्विंटंन डी कॉकच्या शतकी खेळीच्या आधारे आफ्रिकेला ही आघाडी मिळाली होती. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद १२१ धावसंख्येवरुन खेळ सुरु केला. पण डेल स्टेनऐवजी संघात स्थान मिळालेल्या अॅबॉटने ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांची दाणादाण उडवली होती.