२०१९ साली होणाऱ्या चौथ्या कबड्डी विश्वचषकाचा मान दुबईला मिळण्याची शक्यता आहे. २९ जुन रोजी आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. जास्तीत जास्त देशांमध्ये कबड्डीचा प्रसार होणं गरजेचं होतं, याचसाठी दुबईत सहा देशांची निमंत्रीत कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचं आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जनार्दनसिंह गेहलोत यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. या स्पर्धेची तयारी, आयोजन पाहता आगामी वर्षात येणारा विश्वचषक दुबईत भरवला जाण्याची शक्यता आहे. मात्र याबद्दल कोणतही अधिकृतरित्या वृत्त देण्यासाठी गेहलोत यांनी नकार दिला आहे.

“आतापर्यंतचे तिन्ही विश्वचषक हे भारतात आयोजित करण्यात आले होते. इतर देशांमध्ये कबड्डीचा प्रसार होण्यासाठी आम्ही यंदा कबड्डी विश्वचषक बाहेर आयोजित करण्याच्या विचारात आहोत. मात्र ठिकाणाबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बाहेर आयोजन करण्यामागच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा आम्ही सध्या विचार करतो आहोत. त्यामुळे ठिकाणाबद्दल अधिक संभ्रम करण्यापेक्षा ज्यावेळी अंतिम निर्णय घेतला जाईल त्यावेळी जागेची घोषणा करण्यात येईल.” जनार्दनसिंह गेहलोत यांनी आपली बाजू मांडली.

२९ जूनरोजी होणाऱ्या बैठकीत आंतरराष्ट्रीय कबड्डी परिषद, सध्या दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धा खेळत असलेल्या सहाही देशांचं मत विचारात घेणार आहे. (भारत, इराण, पाकिस्तान, कोरिया, अर्जेंटीना, केनिया) यानंतर आगामी विश्वचषकात ३ लॅटीन अमेरिकन देश सहभागी होण्याची शक्यताही अर्जेंटीना कबड्डी फेडरेशनच्या अध्यक्षांनी बोलून दाखवली आहे. २००४ साली मुंबईत पहिला कबड्डी विश्वचषक खेळवण्यात आला होता, यानंतर पनवेल येथे २००७ साली दुसरा तर अहमदाबाद येथे २०१६ साली तिसरा कबड्डी विश्वचषक भरवण्यात आला होता. त्यामुळे आगामी विश्वचषक भारताची वेस ओलांडून बाहेर जातो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.