दुबईत पार पडत असलेल्या ६ निमंत्रीत देशांच्या स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात येणाऱ्या भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ३६-२० अशी मात केली. भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दुबईत या स्पर्धेच्या चषकाचं अनावरण केलं.

भारताकडून कर्णधार अजय ठाकूरने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या सत्रापासून अजय, प्रदीप नरवाल यांनी आक्रमक चढाया करत पाकिस्तानच्या बचावफळीला खिंडार पाडलं. मधल्या काही मिनीटांमध्ये पाकिस्तानने भारताचा चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय बचावफळीच्या भक्कम बचावापुढे पाकिस्तानची डाळ शिजू शकली नाही. या खेळीच्या जोरावर भारताने मध्यांतरीला २१-८ अशी भक्कम आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रातही भारताने खेळाला आक्रमक सुरुवात केली. या सत्रातही पाकिस्तानला सर्वबाद करण्यात भारताचा संघ यशस्वी ठरला. अखेर ३६-२० या फरकाने पाकिस्तानवर मात करत स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना शनिवारी केनियाविरुद्ध खेळवला जाणार आहे.