दुबईत पार पडत असलेल्या निमंत्रीत सहा देशांमधील दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात भारताने कोरियाचं आव्हान ३६-२० असं मोडीत काढून कबड्डीतलं आपलं वर्चस्व पून्हा एकदा सिद्ध केलं. अंतिम फेरीत भारताची गाठ तुल्यबळ इराणशी पडणार आहे. इराणने दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानवर मात केली होती.

सामन्याच्या सुरुवातीला कोरियाच्या संघाने अनपेक्षितरित्या आघाडी घेत भारतीय संघाला धक्का दिला होता. मात्र कर्णधार अजय ठाकूरच्या चढाईच्या जोरावर भारताने आपली पिछाडी भरुन काढत सामन्यावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. अवघ्या काही वेळामध्येच कोरियाच्या संघाला सर्वबाद करुन भारताने सामन्यात आघाडीही घेतली. मोनू गोयत, रिशांक देवाडीगा यांच्या चढायांमुळे कोरियाचे खेळाडू पटापट बाद होत राहिले. प्रदिप नरवालने आज चढाईत आपली चमक दाखवली.

एकीकडे चढाईपटू आपली चमक दाखवत असताना बचावफळीत महाराष्ट्राच्या गिरीश एर्नाकने आपला हिसका दाखवला. कोरियातील काही प्रमुख खेळाडूंच्या पकडी करुन गिरीशने संघातल्या डाव्या कोपऱ्याच्या जागेवर आपली दावेदारी पक्की केली. भारताच्या या आक्रमक पवित्र्यापुढे कोरियाची डाळ फार काळ शिजू शकली नाही. अखेर ३६-२० अशा फरकाने विजय मिळवत भारताने अंतिम फेरीतली आपली जागा निश्चीत केली. या स्पर्धेत भारताचा संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला नाहीये.