भारताचा ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता याला शेवटच्या फेरीत पराभवास सामोरे जावे लागले, त्यामुळे १६ व्या दुबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पदक मिळविण्याचे स्वप्न अभिजीतला साकार करता आले नाही. त्याला चौथे स्थान मिळाले.
अभिजीत हा आठव्या फेरीत दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे त्याला पदकाची संधी होती. मात्र शेवटच्या फेरीत त्याला व्हेनेत्झुएलाच्या एडवर्ड इतुरिझागा याने हरविले. अभिजीतला साडेसहा गुणांवरच समाधान मानावे लागले. फ्रान्सच्या रोमेन एडवर्ड याने आठ गुणांसह अजिंक्यपद मिळविले. त्याने शेवटच्या फेरीत अग्रमानांकित अन्तोन कोरोबोव्ह याच्यावर सनसनाटी विजय नोंदविला.
इतुरिझागा याने सात गुणांसह उपविजेतेपद मिळविले. युक्रेनच्या युरियु कुझुबोव्ह याचेही सात गुण झाले, मात्र प्रगत गुणांच्या आधारे त्याला तिसरे स्थान मिळाले. एम.ललित बाबू व एम.शामसुंदर यांनी संयुक्तरीत्या दहावे स्थान पटकाविले. शेवटच्या फेरीत त्यांच्यातच झालेला डाव बरोबरीत सुटला.