भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने (११८ चेंडूंत १५३ धावा) साकारलेल्या धडाकेबाज दीडशतकाच्या बळावर दिल्लीने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला तीन गडी आणि चार चेंडू राखून पराभूत केले. चार सामन्यांतील दुसऱ्या पराभवामुळे महाराष्ट्राच्या बाद फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.

प्रथम फलंदाजी करताना अझिम काझी (९१) आणि केदार जाधव (८६) यांच्या अर्धशतकांमुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद ३२८ धावांपर्यंत मजल मारले. ललित यादवने दिल्लीसाठी सर्वाधिक तीन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात धवन आणि ध्रुव शोरे (६१) यांनी १३६ धावांची सलामी भागीदारी रचताना दिल्लीच्या विजयाची पायाभरणी केली. तब्बल २१ चौकार आणि एका षटकारासह १५३ धावा फटकावल्यावर धवन माघारी परतला. त्यानंतर नितीश राणा (२७) आणि क्षितीज शर्मा (३६) यांनी दिल्लीला विजयीरेषा ओलांडून दिली. सलग तिसऱ्या विजयामुळे दिल्ली ‘ड’ गटात दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राला बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सोमवारी पुदुचेरीविरुद्धचा अखेरचा साखळी सामना जिंकणे अनिवार्य आहे.

बाद फेरीच्या लढतींचे दिल्लीत आयोजन

मुंबई : विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढती दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहेत. अरुण जेटली स्टेडियम आणि पालम मैदान येथे या सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असून ७ मार्चपासून बाद फेरीला प्रारंभ होणार आहे. ११ मार्च रोजी दोन उपांत्य सामने आणि १४ मार्चला अंतिम फेरी खेळवण्यात येईल. बाद फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघांना ४ मार्चपर्यंत दिल्ली येथे विलगीकरणासाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तूर्तास देशातील सहा शहरांमध्ये विजय हजारे स्पर्धेचे साखळी सामने सुरू असून १ मार्चपर्यंत बाद फेरीचे समीकरण स्पष्ट होणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेनंतर यंदाच्या वर्षातील ही दुसरी स्थानिक स्पर्धा असून करोना साथीच्या पार्श्वभूमी    वर यावेळी रणजी स्पर्धा रद्द करून विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेला प्राधान्य देण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : ५० षटकांत ७ बाद ३२८ (अझिम काझी ९१, केदार जाधव ८६; ललित यादव ३/६९) पराभूत वि. दिल्ली : ४९.२ षटकांत ७ बाद ३३० (शिखर धवन १५३, ध्रुव शोरे ६१; सत्यजित बच्छाव ३/६८)