स्क्वॉश संघटक ऋत्विक भट्टाचार्य यांची खंत
एके काळी स्क्वॉशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दबदबा होता. आताही त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. भारतात होणाऱ्या स्क्वॉश चॅलेंजर सर्किटमध्ये खेळण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र लाल फितीच्या कारभारामुळेच त्यांना या स्पर्धापासून दूर राहावे लागते आहे, अशी खंत व्यावसायिक स्क्वॉश असोसिएशनचे (पीएसए) दक्षिण-पूर्व विभागाचे प्रतिनिधी आणि माजी स्क्वॉशपटू ऋत्विक भट्टाचार्य यांनी व्यक्त केली.
आयव्ही स्पोर्ट्स आणि जेएसडब्ल्यू स्टील यांच्यातर्फे चॅलेंजर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत एनएससीआय आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे पहिले दोन आणि त्यानंतर अनुक्रमे कोलकाता आणि चेन्नई येथे स्पर्धेचा तिसरा आणि चौथा टप्पा रंगणार आहे. नव्या हंगामाच्या सुरुवातीला होणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक अव्वल खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मात्र व्हिसा आणि तांत्रिक मुद्दय़ांमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना स्पर्धेत खेळता येणार नाही.
‘‘पाकिस्तानी खेळाडूंनी खेळावे यासाठी आम्ही पाकिस्तानमधील स्क्वॉश संघटनेशी संपर्क केला. भारतातील पाकिस्तानच्या दूतावासातील अधिकारी आणि पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र व्हिसा मिळण्यात तांत्रिक अडचणी आहेत. स्पर्धा, स्पर्धेचे ठिकाण, संयोजक यांची सत्यासत्यता पडताळली जाते. या सगळ्या प्रकाराला दोन महिनेही लागू शकतात. किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे त्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता असते. याव्यतिरिक्त भारतात पाकिस्तानी खेळाडू खेळणार असल्यास राजकीय आणि सामाजिक स्तरातून विरोध होतो. पाकिस्तानच्या दर्जेदार खेळाडूंसह खेळण्याची संधी भारताच्या युवा खेळाडूंना मिळू शकते. मात्र लाल फितीच्या कारभारामुळे ही संधी हुकते,’’ असे भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानी खेळाडूंना जगभर खेळताना या अडचणी सातत्याने उद्भवतात असेही त्यांनी नमूद केले.

चॅलेंजर सर्किटमुळे क्रमवारी गुण
एनएससीआय आणि सीसीआय येथे होणाऱ्या स्पर्धाद्वारे भारतीय खेळाडूंना क्रमवारीचे गुण आणि बक्षीस रक्कम असा दुहेरी फायदा होणार आहे. आतापर्यंत क्रमवारी गुण मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंना युरोपातील स्पर्धामध्ये खेळावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय युवा भारतीय खेळाडूंना वाइल्डकार्डद्वारे खेळण्याची संधीही मिळणार आहे. एनएससीआय स्पर्धेच्या विजेत्याला दहा हजार डॉलर्स तर सीसीआय स्पर्धेसाठी ३५ हजार डॉलर्स बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.