भारतीय क्रिकेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला सलामीवीर गौतम गंभीर याने महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इंग्लंड दौऱ्यादरम्यान धोनीच्या संथ खेळीवर गंभीरने टीका केली आहे. धोनीच्या संथ खेळीमुळे संघातील इतर फलंदाजांवर दबाव वाढतो, असं गंभीर म्हणाला आहे.

‘क्रिकबझ’ला दिलेल्या एका मुलाखतीत गंभीर म्हणाला, ”सध्या धोनी ज्या प्रकारे संथ फलंदाजी करतोय त्यामुळे संघातील इतर फलंदाजांवर दबाव निर्माण होत आहे. मी गेल्या काही वर्षांमध्ये धोनीला इतकी संथ खेळी करताना पाहिलं नाही, फलंदाजीतील काही बाबींवर धोनीने विशेष मेहनत घेण्याची गरज आहे. डावाच्या सुरूवातीला धोनी थोडा वेळ घेतो आणि अखेरच्या दहा षटकांमध्ये आक्रमक खेळतो अशा धोनीला आपण ओळखतो, पण गेल्या दोन सामन्यांमध्ये धोनीचा खेळ तसा नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात ज्या क्षणी धोनी बाद झाला त्यावेळी त्याच्याकडून आक्रमक खेळीची सर्वांना अपेक्षा होती. जर धोनी शेवटपर्यंत मैदानात टिकला असता तर धावसंख्या नक्कीच २७० ते २८० च्या आसपास झाली असती. जर तुम्ही डावाच्या सुरूवातीला बॉल वाया घालवणार असाल तर अखेरपर्यंत फलंदाजी करण्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी” असं गंभीर म्हणाला.

भारताचा माजी कर्णधार व महान फलंदाज सौरव गांगुलीनेही धोनीच्या खेळीवर टीका केली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवायचे असल्यास त्याला कामगिरी उंचावण्याची गरज आहे, अन्यथा त्याच्यावर संघाबाहेर जाण्याची वेळ ओढवू शकते, अशी कणखर प्रतिक्रिया गांगुलीने दिली.

‘‘धोनी हा एक अनुभवी फलंदाज तसेच चाणाक्ष व्यक्ती असून भारताला विश्वचषकात त्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठी धोनीने स्वत: चांगली कामगिरी केली पाहिजे. एकदिवसीय सामन्यात २५ षटके शिल्लक असताना फलंदाजीला आल्यास त्याला सध्या संघाचा डोलारा सावरणे कठिण जात आहे,’’ असे गांगुली म्हणाला.

तो पुढे म्हणाला, ‘‘धोनीविषयी सर्वानाच आदर आहे. एकदिवसीय सामन्यांत त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. मात्र, भारताकडे गुणी खेळाडूंची खाण उपलब्ध आहे. त्यामुळे निवड समितीने संघाच्या हिताचे जे आहे त्याला अनुसरून निर्णय घेतला पाहिजे.’’