इंडिया ब्ल्यू संघातर्फे चेतेश्वर पुजारा, शेल्डॉन जॅक्सनची शतकी खेळी

बाद फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेच्या निर्णायक लढतीत इंडिया ब्ल्यू संघाने सातशेहून अधिक धावांचा डोंगर उभारला. फलंदाजासाठी अनुकूल अशा खेळपट्टीवर इंडिया ग्रीन संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत चेतेश्वर पुजारा आणि शेल्डॉन जॅक्सन यांनी शतकी खेळी साकारली.

दुसऱ्या दिवशी ब्ल्यू संघाने ३ बाद ३३६ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. कामगिरीत सातत्य नसल्याने आणि संथ खेळामुळे भारतीय कसोटी संघातील स्थान गमावलेल्या चेतेश्वर पुजाराने फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत खेळ केला. श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३२व्या शतकाची नोंद केली. शतक पूर्ण झाल्यानंतर पुजाराने आक्रमक पवित्रा स्वीकारला. अशोक दिंडाने दिनेश कार्तिकला बाद करत ही जोडी फोडली. कार्तिकने ४८ धावा केल्या तर पुजारा-कार्तिक जोडीने पाचव्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. कार्तिकच्या जागी आलेल्या शेल्डॉन जॅक्सनला साथीला घेत पुजाराने धावफलक हलता ठेवला. गोपाळच्याच गोलंदाजीवर एकेरी धाव घेत पुजाराने दीडशे धावा पूर्ण केल्या. गोपाळनेच पुजाराला त्रिफळाचीत करत त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याने २४ चौकारांसह १६६ धावांची खेळी साकारली. परवेझ रसूलही गोपाळच्या फिरकीची शिकार ठरला. त्याने २५ धावा केल्या. कर्ण शर्मा आणि शेल्डॉन जॅक्सन जोडीने आठव्या विकेटसाठी १८.१ षटकांत १०८ धावांची वेगवान भागीदारी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात कर्ण शर्मा गोपाळच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. मोहित शर्माने साथ दिल्यामुळे जॅक्सनने कारकीर्दीतील दहाव्या प्रथम श्रेणी शतकाची नोंद केली. जॅक्सनच्या शतकानंतर मोहित शर्मा बाद झाला. पाठोपाठ गोपाळने जॅक्सनला बाद केले  आणि ब्ल्यू संघाचा डाव ७०७ धावांवर आटोपला. जॅक्सनने ११४ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह १०५ धावांची वेगवान खेळी साकारली. ग्रीन संघातर्फे श्रेयस गोपाळने ५ बळी घेतले.

ग्रीन संघातर्फे जसप्रीत बुमराह, अशोक दिंडा, श्रेयस गोपाळ, जलाज सक्सेना आणि प्रग्यान ओझा यांनी शंभरहून अधिक धावा दिल्या.

संक्षिप्त धावफलक

इंडिया ब्ल्यू : १७६. ३ षटकांत सर्वबाद ७०७ (चेतेश्वर पुजारा १६६, मयांक अगरवाल १६१, शेल्डॉन जॅक्सन १०५; श्रेयस गोपाळ ५/१७३)