मुंबईचा रणजी खेळाडू पृथ्वी शॉने दमदार कामगिरी करत दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावलं आहे. ‘इंडिया रेड’ संघाकडून खेळताना पृथ्वीने शतकी खेळी केली आहे. रणजी करंडक स्पर्धेपाठोपाठ पृथ्वीने दुलीप करंडकाच्या पदार्पणाच्या सामन्यातही शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. ‘इंडिया ब्ल्यू’ संघाविरुद्ध लखनऊच्या मैदानावर सध्या दुलीप करंडकाचा अंतिम सामना सुरु आहे. या शतकासह दुलीप स्पर्धेत पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

नाणेफेक जिंकत दिनेश कार्तिकच्या इंडिया रेड संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अखिल हेरवाडकर आणि पृथ्वी शॉ या दोन्ही मुंबईकर फलंदाजांनी इंडिया रेड संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र दोन विकेट गेल्यानंतर पृथ्वी शॉने कर्णधार दिनेश कार्तिकच्या साथीने संघाचा डाव सावरत आपल्या संघाचा डाव सावरला. या दरम्यान पृथ्वीने आपलं शतकही साजरं केलं.

याआधी भारतीय युवा संघाच्या इंग्लड दौऱ्यातही पृथ्वी शॉने दमदार कामगिरी करत सर्वांनी मन जिंकून घेतली होती. ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत पृथ्वीने २१,४८,२६,१३ आणि ५२ धावांची खेळी केली होती. याव्यतिरीक्त औपचारिक कसोटी सामन्यातही पृथ्वीने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे या सामन्यात पृथ्वीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.