प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या मध्य विभागाने तिसऱ्या दिवशी चिवट फलंदाजी करीत चांगली धावसंख्या उभारण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्याचे अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने दक्षिण विभागाला सामना जिंकण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागणार आहेत.
सकाळच्या सत्रात अली मुर्तझा आणि पीयूष चावला यांनी दक्षिण विभागाच्या तळाच्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवल्याने त्यांचा पहिला डाव ३७९ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर फैझ फैझल (७२) आणि जलाल सक्सेना (७१) यांनी १२८ धावांची दमदार सलामी नोंदवली. त्यामुळे मध्य विभागाने दिवसअखेर ४ बाद २१४ अशी मजल मारताना १११ धावांची आघाडी घेतली असून, त्यांचे सहा फलंदाज बाकी आहेत. मध्य विभागाने ही आघाडी २२५ ते २५०पर्यंत वाढवल्यास फिरोझशाह कोटलाच्या खेळपट्टीवर पाचव्या दिवशी फलंदाजी करणे दक्षिण विभागाला मुश्किल जाईल. खेळ थांबला तेव्हा रॉबिन बिश्त आणि महेश रावत अनुक्रमे २६ आणि ११ धावांवर खेळत होते.