गंभीर, पुजाराची दमदार अर्धशतके

सलामीवीर मयांक अगरवालने फलंदाजीतील सातत्य कायम असल्याची ग्वाही देताना १६१ धावांची शानदार खेळी साकारली. त्यामुळेच फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर उपांत्य फेरीचे महत्त्व लाभलेल्या दुलीप करंडक क्रिकेट लढतीत इंडिया ब्ल्यूने पहिल्या दिवशी ३ बाद ३३६ अशी दमदार मजल मारली.

मागील लढतीत अगरवालचे (९२) शतक हुकले होते. मात्र इंडिया ग्रीनविरुद्धच्या सामन्यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावताना कोणतीही चूक केली नाही. त्याने २१८ चेंडूंत २१ चौकार व एका षटकारासह खेळी फुलवली.

इंडिया ब्ल्यूचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारताना अगरवालसोबत २१२ धावांची भक्कम सलामी दिली. इंडिया रेडविरुद्ध या जोडीने १५१ धावांची भागीदारी केली होती.

अनुभवी गंभीरने १० चौकारांसह १९३ चेंडूंत ९० धावा केल्या. मात्र शतकाच्या उंबरठय़ावर असताना तो धावचीत झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने १३ चौकारांसह नाबाद ६३ धावा केल्या. त्याने अगरवालसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. अगरवालचा अडसर अशोक दिंडाने दूर केला. मग सिद्धेश लाडने (१) निराशा केली. खेळ थांबला तेव्हा पुजारासह अभिमन्यू मिथून एका धावेवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक

इंडिया ब्ल्यू (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद ३३६ (मयांक अगरवाल १६१, गौतम गंभीर ९०, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ६३; अशोक दिंडा १/५४)