दुलीप करंडकाच्या उत्तर आणि दक्षिण विभागतील अंतिम लढतीच्या  पहिल्या दिवसाचा खेळ खेळपट्टी खेळण्यायोग्य नसल्याने रद्द करण्यात आला. पावसामुळे खेळपट्टी निसरडी झाली होती. पंच सुरेश शास्त्री आणि संजय हजारे यांनी उपाहारानंतरच्या सत्रात खेळपट्टीची पाहणी केली आणि पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कोचीत गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचा फटका या सामन्याला बसला आहे. याच ठिकाणी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीतही नाणेफेकीचा कौल घेऊन विजेता संघ ठरवण्यात आला होता. पावसाची शक्यता असतानाही हा सामना दुसरीकडे हलवण्यात आला नाही. मात्र सामन्याचे थेट प्रक्षेपण होत असल्यामुळे आयत्यावेळी सामन्याचे ठिकाण बदलणे बीसीसीआयसाठी शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.