राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

प्रथमेश पालांडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू; प्रणय रुपये उत्कृष्ट पकडपटू, पंकज मोहितेला सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा बहुमान

जयदत्त क्रीडा मंडळातर्फे आयोजित कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुर्गामाता स्पोर्ट्स क्लबने एसएसजी फाउंडेशनचा ३७-३४ असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. दुर्गामाता स्पोर्ट्सचा प्रथमेश पालांडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

मुंबई शहरच्या कुमार गटाच्या निवड चाचणी स्पर्धेतही हेच दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांशी भिडले होते, त्या वेळी दुर्गामातानेच बाजी मारली होती. आता पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत दुर्गामाता स्पोर्ट्स क्लबने विजेतेपदावर नाव कोरले. अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक स्थितीत असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात प्रत्येकी एका लोणची नोंद करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्गामाताने पहिल्या डावात मिळवलेले पाच बोनस गुण त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले. त्यामुळेच मध्यंतराला दुर्गामाताने २१-१८ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.

दुसऱ्या डावातही दुर्गामाताने बोनस गुण मिळवण्यावरच भर दिला. त्यामुळे त्यांना ७ बोनस गुण पटकावता आले. एसएसजीच्या चढाईपटूंना संपूर्ण सामन्यात फक्त एकाच बोनस गुणावर समाधान मानावे लागले. बोनस गुणांमधील हाच फरक निर्णायक ठरला.

करण कदमचा झंझावाती अष्टपैलू खेळ आणि त्याला प्रथमेश पालांडेने चढाईत दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे दुर्गामाताला हा विजय मिळविता आला. एसएसजीच्या पंकज मोहिते, ओमकार पोरे यांनी कडवी लढत दिली. पण बोनस गुण मिळविण्यात आलेले अपयश एसएसजीच्या पराभवास कारणीभूत ठरले.

त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुर्गामाताने श्रीराम संघाला ३७-१५ असे हरवले होते. तर एसएसजी फाउंडेशनने सह्याद्री मित्र मंडळाचा ४३-३९ असा पराभव केला होता. सह्याद्री मित्र मंडळाचा प्रणय रुपये याला स्पर्धेतील उत्कृष्ट पकडपटूचा तर एसएसजीच्या पंकज मोहितेला सर्वोत्तम चढाईपटूचा पुरस्कार देण्यात आला.