एलबीबीच्या अखेरच्या वर्षांचे शिक्षण घेणाऱ्या द्युती चंदचे उद्दिष्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेंगळूरु : जकार्ता आशियाई क्रीडा स्पध्रेत दुहेरी रौप्यपदकाचे यश मिळवणारी द्युती चंद सध्या कलिंगा महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे; परंतु एलएलबी करून न्यायालयात लढायचे नाही, मला खेळायचे आहे आणि मग प्रशिक्षक होऊन खेळाडू घडवायचे आहेत, असे तिने आत्मविश्वासाने सांगितले.

शरीरात पुरुष संप्रेरके असल्याचे कारण देत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने धावपटू द्युतीवर काही वर्षांपूर्वी बंदी घातली होती. मात्र ल्युसान येथील क्रीडा लवाद न्यायालयापुढे तिने बंदीविरोधात दाद मागितली. संघर्षमय लढय़ानंतर तिला निर्दोष ठरवण्यात आले. द्युती भुवनेश्वर येथील कलिंगा महाविद्यालयात एलएलबीच्या अखेरच्या वर्षांला आहे; परंतु अभ्यास आणि खेळ यांचे व्यवस्थापन करून हे शिक्षण घेत आहे. स्पर्धा आणि सराव यामुळे अभ्यासाला वेळ कमी पडतो, असे द्युतीने प्रामाणिकपणे सांगितले. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पध्रेत द्युतीने १०० मीटर आणि २०० मीटर अशा दोन्ही स्पर्धामध्ये रौप्यपदकाची कमाई केली.

आंतराष्ट्रीय स्तरावरील आगामी आव्हानांविषयी द्युती म्हणाली, ‘‘सध्या आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेसाठी मी तयारी करीत आहे. ओरिसामधील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आशियाई पदकांनंतर पुढील मोहिमांसाठी सर्वतोपरी आर्थिक साहाय्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत मी कधीही परदेशात प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र ऑलिम्पिकसाठी परदेशातील प्रशिक्षणाची आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय पदके मिळवणाऱ्या भारताच्या बहुतांशी अव्वल धावपटूंनी परदेशात प्रशिक्षण घेतले आहे.’’

आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आफ्रिकेच्या धावपटूंचे कितपत आव्हान वाटते, या प्रश्नाला उत्तर देताना द्युती म्हणाली, ‘‘ऑलिम्पिकमध्ये आफ्रिकेतील धावपटूंशी स्पर्धा असली, तरी त्याचा मला काहीच फरक पडत नाही. विविध देशांनुसार शारीरिक क्षमता व्यक्तीमध्ये असतात. माझ्यातील सर्वोत्तम क्षमतेचा वापर करून पदकाच्या ईष्र्येने धावणे, हीच माझी जबाबदारी असेल.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘आशियाई क्रीडा स्पध्रेत १०० मीटर शर्यतीत मला ११.३२ सेकंद ही वेळ नोंदवता आली. ऑलिम्पिकच्या दृष्टिकोनातून ११.१० सेकंद ही वेळ गाठण्याची आवश्यकता आहे.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dutee chand ambition to play and then be a coach
First published on: 12-09-2018 at 01:02 IST