ओदिशाची धावपटू द्युती चंदला पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या द्युतीला आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे निमंत्रण आल्यामुळे तिला सुखद धक्का बसला आहे.

लंडन येथे ४ ते १३ ऑगस्ट या कालावधीत जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेसाठी आवश्यक असलेली ११.२६ सेकंदांची वेळ गाठण्यात  द्युती अपयशी ठरली होती. मात्र महिलांच्या १०० मीटर शर्यतीसाठी ५६ धावपटू सहभागी होऊ शकतात. हा आकडा गाठण्यासाठी तिला आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने स्पर्धेत भाग घेण्यासाठी बोलावले आहे.

नवी दिल्ली येथे १५ मे रोजी झालेल्या भारतीय ग्रँड प्रिक्स स्पर्धेत द्युतीने ११.३० सेकंद अशी वेळ नोंदवली होती.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले की, ‘‘महिलांच्या १०० मीटर शर्यतीसाठी द्युती चंदला थेट प्रवेश मिळाला असल्याचे आम्हाला आंतरराष्ट्रीय संघटनेकडून कळवण्यात आले आले  होते. आम्हाला १२ तासांत होय किंवा नाही, हा निर्णय कळवायचा होता आणि आम्ही हा प्रस्ताव स्वीकारला.’’