|| धनंजय रिसोडकर

कोणत्याही परिस्थितीआधी ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे ध्येय साध्य करून त्यानंतरच स्वत:च्या मोठय़ा घराची स्वप्नपूर्ती करणार आहे, अशा शब्दांत भारताची अव्वल धावपटू द्युती चंदने तिची प्राथमिकता स्पष्ट केली. वसई-विरार महापौर मॅरेथॉनच्या शर्यतीनंतर द्युतीने तिच्या भावना स्पष्ट केल्या.

द्युतीने तिची सर्वोच्च प्राथमिकता ही ऑलिम्पिकला असल्याचे सांगतानाच यापूर्वीच्या तिच्या कटू अनुभवाला विसरून नव्याने प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. रिओ ऑलिम्पिकला ११.३२ सेकंद ही पात्रता असताना द्युतीने ११.३३ सेकंदांची वेळ दिल्याने तिची त्यावेळची संधी हुकली होती. ती संधी यंदा कोणत्याही स्थितीत गाठायचीच, असा निर्धार द्युतीने व्यक्त केला. आपल्या कच्च्या मातीच्या घराला भव्य घरात रूपांतरित करण्याचे स्वप्न तिने त्यासाठी काही काळ लांबणीवर टाकले आहे.

‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळालेली दोन रौप्यपदके माझ्यासाठी खूप अनमोल असून त्या पदकांमुळे मला माझ्या पुढच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. एका अतिसामान्य घरातील मुलीला केवळ मोठय़ा बहिणीच्या पाठिंब्यामुळे थेट आशियाई स्पर्धेपर्यंत मजल मारता आली. माझ्या आयुष्यात मला नकारात्मक बोलणारे अनेक भेटले, पण त्यामुळे मी माझ्या ध्येयापासून विचलित झाले नाही. अतिरिक्त टेस्टोस्टेरॉन प्रकरणात मला खूप वाईट अनुभव येऊनही माझे प्रशिक्षक एन. रमेश यांनी माझ्यात आत्मविश्वास जागृत केला, त्यामुळेच हे शक्य झाले,’’ असे द्युतीने नमूद केले.