वेस्ट इंडिज आणि डान्स यांचं एक घट्ट नातं आहे. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी वेळोवेळी त्याची प्रचिती दिली आहे. विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मैदानावर केलेले सेलिब्रेशन अजूनही प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. इतकेच नव्हे तर IPL किंवा इतर क्रिकेट लीग स्पर्धांच्या पार्ट्यांमध्येही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा डान्स चर्चेचा विषय असतो. असाच एका पार्टीचा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे. त्या पार्टीमध्ये अभिनेता शाहरूख खान आणि वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हे दोघे ‘लुंगी डान्स’ या गाण्यावर नाचताना दिसले. ब्राव्होने स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. एका बोटीत ही पार्टी करण्यात आली.

दरम्यान, ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑक्टोबर २०१८ मध्ये तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. ३५ व्या वर्षी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. ‘सर्व क्रिकेट जगताला मला सांगायचे आहे की आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. १४ वर्षांपूर्वी मी क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडिजच्या संघासाठी पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. आजही मला तो क्षण स्पष्टपणे आठवतोय जेव्हा जुलै महिन्यात २००४ साली इंग्लंडविरुद्धच्या लॉर्डस मैदानावरील सामन्याआधी मला विडिंजच्या संघाची मरुन रंगाची टोपी देण्यात आली होती. त्यावेळी माझ्यात असणारा उत्साह आणि खेळाबद्दलचे प्रेम मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कायम ठेवले याचा मला आनंद आहे’ असं ब्रॉव्होने निवृत्तीनंतर काढलेल्या पत्रकात म्हणाला होते.

ब्राव्होने कसोटी क्रिकेट कारकीर्दीत ४० सामन्यात २ हजार २०० धावा आणि ८६ बळी टिपले. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. १६४ एकदिवसीय सामन्यात त्याने २ हजार ९६८ धावा आणि १९९ गडी बाद केले. तर टी२० कारकिर्दीत त्याने ६६ सामन्यात १ हजार १४२ धावा केल्या आणि ५२ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.