वेस्ट इंडिजचा संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. स्थानिक वेळेनुसार काल रात्री ब्राव्होने निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे ब्राव्हो यापुढे वेस्ट इंडिज संघाच्या जर्सीमध्ये दिसणार नाही.

विंडीजच्या या ३५ वर्षीय खेळाडूने आपल्या निवृत्तीसंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. ‘सर्व क्रिकेट जगताला मला सांगायचे आहे की आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. १४ वर्षांपूर्वी मी क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडिजच्या संघासाठी पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. आजही मला तो क्षण स्पष्टपणे आठवतोय जेव्हा जुलै महिन्यात २००४ साली इंग्लंडविरुद्धच्या लॉर्डस मैदानावरील सामन्याआधी मला विडिंजच्या संघाची मरुन रंगाची टोपी देण्यात आली होती. त्यावेळी माझ्यात असणारा उत्साह आणि खेळाबद्दलचे प्रेम मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कायम ठेवले याचा मला आनंद आहे’ असं ब्रॉव्हो या पत्रकात म्हणाला आहे.

तरुण पिढीला संधी देण्यासाठी आपण निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले. एक व्यवसायिक क्रिकेटपटू म्हणून अनेकांनी जो निर्णय घेतला तो मीही घेणे गरजेचे आहे. म्हणूनच मी नवीन खेळाडूंना संधी देण्यासाटी क्रिकेटचे मैदान सोडत असल्याचे ब्रोव्हो म्हणाला आहे. माझी कारकीर्द यशस्वी होण्यासाठी हातभार लावलेल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. खास करुन माझे कुटुंब आणि मी जिथे माझे क्रिकेटमधील कैशल्य शिकलो त्या क्विन्स पार्क क्रिकेट क्लबचे विशेष आभार. ऑन आणि ऑफ फिल्ड माझ्या पाठीशी कायमच ठामपणे उभ्या राहणाऱ्या सर्व चाहत्यांना मनापासून धन्यवाद. माझ्या कारकिर्दीमध्ये मी जगभरातील क्रिकेट मैदानांवरील ड्रेसिंग रुम्स या खेळातील दिग्गजांबरोबर शेअर करु शकलो यासाठी स्वत:ला नशिबवान समजतो. तसेच या पुढे मी व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून माझी कारकीर्द सुरूच ठेवेन आणि खऱ्या चॅम्पियनप्रमाणे चाहत्यांचे मनोरंजन करत राहीन, असेही ब्राव्होने आपल्या निवृत्ती पत्रकामध्ये म्हटले आहे. म्हणजेच ब्राव्हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल.

ब्राव्होची कारकीर्द

कसोटी क्रिकेट

सामने – ४०
धावा – २२००
सरासरी – ३१.४२
बळी – ८६
सर्वोत्तम कामगिरी – ५५ धावांत ६ बळी

एकदिवसीय क्रिकेट

सामने – १६४
धावा – २,९६८
सरासरी – २५.३६
बळी – १९९
सर्वोत्तम कामगिरी – ४३ धावांत ६ बळी

टी२०

सामने – ६६
धावा – १,१४२
सरासरी – २४.२९
बळी – ५२
सर्वोत्तम कामगिरी – २८ धावांत ४ बळी