ऑलिम्पिक प्रवेशाची प्रतीक्षा कायम
भारताची अव्वल दर्जाची धावपटू द्युती चंदने तैवान खुल्या मैदानी स्पर्धेत २०० मीटर धावण्याची शर्यत जिंकून लागोपाठ दुसरे सुवर्णपदक जिंकले.
द्युतीने २०० मीटरचे अंतर २३.५२ सेकंदांत पार केले. तिच्याच सहकारी श्रावणी नंदा (२३.५५ सेकंद) व ज्योती (२३.९२ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले. द्युतीने याआधी या स्पर्धेत १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकली होती. ऑलिम्पिकचा निकष पूर्ण करण्यात तिला अपयश आले.
बीजिंग येथे नुकत्याच झालेल्या जागतिक चॅलेंजर स्पर्धेत या तीन खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र येथे त्यांच्या संघाला बॅटन अदलबदलाच्या वेळी झालेल्या चुकीमुळे बाद व्हावे लागले.
भारताच्या कृपालसिंग बथ्थने पुरुषांच्या थाळीफेकीत सुवर्णपदक मिळवले तर अर्जुन कुमारने रौप्यपदक मिळवले. त्यांनी अनुक्रमे ५८.२० मीटर व ५५.५० मीटर अशी कामगिरी केली. परंतु ऑलिम्पिक पात्रता निकष (६५ मीटर) त्यांना पार करता आला नाही. ओमप्रकाश कऱ्हानाने गोळाफेकीत रौप्यपदक (१७.८५ मीटर) पटकावले. मात्र त्यालाही ऑलिम्पिक निकष (२०.५० मीटर) गाठण्यात अपयश आले. तिहेरी उडीत एरिव्हू सेल्वम देवेंद्रनने १५.६२ मीटर अशी कामगिरी करीत कांस्यपदक मिळवले.