ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक पदके मिळवावी, यासाठी प्रत्येक राज्याने एका खेळाची निवड करून त्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी इच्छा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.

एका वेबिनारदरम्यान रिजिजू यांनी ‘एक राज्य, एक खेळ’ या संकल्पनेचा प्रस्ताव मांडला. ‘‘भारताच्या प्रत्येक राज्यातील क्रीडा मंत्र्यालयांना ‘एक राज्य, एक खेळ’ या मोहिमेचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल. या उपक्रमांतर्गत एखाद्या राज्याला विशिष्ट खेळाच्या विकासावर अधिक लक्ष देऊन उदयोन्मुख खेळाडू देशाला शोधून देता येतील. मणिपूर हे राज्य बॉक्सिंग या खेळावर विशेष लक्ष देऊ शकते,’’ असे रिजिजू म्हणाले.