भारतात जेव्हा क्रिकेटबद्दल बोलायची वेळ येते, तेव्हा लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेत तोंडाला येईल तसे बोलतात, अशी सल भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रविवारी बोलून दाखवली. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तो बोलत होता. आठ महिन्यांपूर्वी भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची मालिका गमावल्यानंतर धोनीच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. टीकाकारांनी हा पराभव धोनीच्या कारकीर्दीचा शेवट असल्याची भाकिते वर्तविली होती. या सर्व टीकांना धोनीने कालच्या पत्रकारपरिषदेत उत्तर दिले.
माझ्या मते, भारतात कोणत्याही मुद्द्यावर प्रत्येकाचे स्वत:चे असे एक मत असते, क्रिकेटच्याबाबतीत तर असतेच असते. असे खेळा, तसे खेळा, असेच करा, तसे करू नका, हे अनेकांकडून सांगितले जाते. लोकांना क्रिकेट टेलिव्हिजनवर बघायला सोपे वाटते. मात्र, प्रत्यक्ष मैदानात खेळताना आमच्यासाठी परिस्थिती तितकीशी सोपी नसल्याचे यावेळी धोनीने सांगितले.