बोस्निया-हेझ्रेगोविना संघाने २०१४ साली ब्राझीलमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावत इतिहास घडवला आहे. स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर बोस्नियाने पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्याची किमया साधली आहे. बोस्नियापाठोपाठ युरोपियन गटातून विश्वविजेता स्पेन, इंग्लंड आणि रशिया या संघांनी विश्वचषकासाठीचे आपले स्थान निश्चित केले आहे.
२०१० विश्वचषक आणि २०१२ युरो चषकाच्या प्ले-ऑफ फेरीत पोर्तुगालकडून पराभूत होणाऱ्या बोस्नियाने वेदाद इबिसेव्हिक याने ६८व्या मिनिटाला केलेल्या गोलाच्या बळावर शेवटच्या साखळी सामन्यात लिथुआनियावर १-० असा विजय मिळवला.
या विजयामुळे ‘जी’ गटात बोस्नियाने ग्रीसला गोलफरकाच्या जोरावर ग्रीसला मागे टाकून २५ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले. पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी बोस्निया संघ पात्र ठरल्यानंतर संपूर्ण देशवासीयांनी आनंद साजरा केला. खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते.
बोस्नियाच्या फुटबॉल कारकिर्दीवर एक नजर
*       १९९२मध्ये बोस्निया-हेझ्रेगोविना संघ स्थापन
*       १९९६मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात पहिला विजय
*       २०१० फिफा विश्वचषक, २०१२ युरो चषकाच्या प्ले-ऑफ फेरीत पोर्तुगालकडून पराभूत
*       २००४ आणि २०१२ युरो चषकासाठी पात्र होण्याच्या स्थितीत; मात्र शेवटच्या सामन्यातील पराभवामुळे संधी हुकली
*       पात्रता फेरीतील शेवटच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे २०१० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळता आले नाही
*       २०१३मध्ये फिफा क्रमवारीत १३व्या स्थानी झेप
*       २०१४ फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्याची किमया
स्पेनची आगेकूच
अल्बाकेटे (स्पेन) : गतविजेत्या स्पेनने जॉर्जियाचा २-० असा सहज पराभव करून ‘आय’ गटातून अव्वल स्थान पटकावत फिफा विश्वचषकासाठी स्थान प्राप्त केले. स्पेनने १९९३पासून पात्रता फेरीतील विजयाची परंपरा कायम राखली. फ्रँक रिबरी आणि करिम बेंझेमा यांनी स्पेनसाठी गोल केले. स्पेनने सलग पाचव्यांदा फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्याची करामत केली. १९७८नंतर सर्व विश्वचषक स्पर्धासाठी स्पेन संघ पात्र ठरला आहे.
उरुग्वे, पोर्तुगालवर ‘प्ले-ऑफ’चे संकट
माँटेव्हिडियो : दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या उरुग्वेने अर्जेटिनावर ३-२ असा विजय मिळवला तरी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी उरुग्वेला पुढील महिन्यात होणाऱ्या प्ले-ऑफ फेरीच्या सामन्यात जॉर्डनवर विजय मिळवावा लागणार आहे. पोर्तुगालने शेवटच्या साखळी सामन्यात लक्झेमबर्गवर ३-० अशी मात केली. सलग तिसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र होण्याकरिता पोर्तुगालला प्ले-ऑफ फेरीचे संकट पार करावे लागणार आहे.
रशिया १२ वर्षांनंतर पात्र
मॉस्को : अझरबैजानविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवत रशियाने ‘एफ’ गटात अव्वल स्थान प्राप्त करून १२ वर्षांनंतर प्रथमच फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली. रशियाकडून रोमन शिरोकोव्ह (१६व्या मिनिटाला) आणि अझरबैजानकडून वाजिफ जावाडोव्ह (९०व्या मिनिटाला) यांनी गोल केले.
इंग्लंडचा थाटात प्रवेश
लंडन : वेन रूनी आणि स्टीव्हन गेरार्ड यांनी केलेल्या गोलमुळे इंग्लंडने पोलंडवर २-० असा विजय मिळवत फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश मिळवला. इंग्लंडने एकही पराभव न पत्करता ‘एच’ गटात २२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. रूनीने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत ४१व्या मिनिटाला पहिला गोल लगावला. त्यानंतर ८८व्या मिनिटाला गेरार्डने दुसरा गोल झळकावत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.