जैव-सुरक्षित वातावरणात राहताना विलगीकरणाच्या कठोर नियमांचे पालन करणे अवघड असून यामुळेच थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान माझ्या मानसिकतेवर परिणाम झाला, अशी कबुली भारताचा पुरुष एकेरीतील अनुभवी बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने शुक्रवारी दिली.
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वप्रकारच्या स्पर्धासाठी जैव-सुरक्षित वातावरणात राहणे खेळाडूंना अनिवार्य असून त्यांना विलगीकरणाच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. परंतु यामुळे हळूहळू खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असून त्यांची कामगिरीही खालावत चालली आहे, असे मत २८ वर्षीय प्रणॉयने एका ऑनलाइन सवांदादरम्यान व्यक्त केले.
गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर जानेवारी महिन्यात प्रणॉय प्रथमच बॅडमिंटनकडे परतणार होता. परंतु थायलंड खुल्या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच करोना चाचण्यांसंबंधी झालेल्या गोंधळामुळे प्रणॉयला स्पर्धेतील प्रवेश नाकारण्यात आला.
‘‘बँकॉकमध्ये दाखल होताच आम्हाला जैव-सुरक्षित वातावरणात नेण्यात आले. आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा एखाद्या गोष्टीचा सामना करत होतो. १४ दिवसांचा तो काळ फारच कठीण होता. दिवसाच्या २४ तासांपैकी दोनच तास सरावासाठी हॉटेलबाहेर पडण्याची मुभा होती. कालांतराने या दैनंदिनीचा माझ्या मानसिक आरोग्यावर प्रभाव जाणवू लागला,’’ असे प्रणॉय म्हणाला.
‘‘स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या घोळामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ झालो. मी आणि सायनाने जवळपास संपूर्ण दिवस रुग्णालयातच करोना चाचण्या देण्यात घालवला. त्यानंतर आम्हाला खेळण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी यामुळे माझ्या तयारीवर परिणाम झाला,’’ असेही प्रणॉयने सांगितले.
‘‘जैव-सुरक्षित वातावरण आता खेळाचा भागच झाल्याने विलगीकरणाच्या दिवसांमध्ये मानसशास्त्रज्ञाची भूमिका मोलाची ठरू शकते. मलाही त्या काळात कोणी तरी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच संवाद साधण्यासाठी हवे होते. जेणेकरून मी मन स्थिर ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करू शकलो असतो,’’ असे प्रणॉयने नमूद केले.
सिंधूचा विजयी निरोप; श्रीकांत पुन्हा पराभूत
जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा
बँकॉक : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्याची विजयानिशी सांगता केली. परंतु पुरुष एकेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या दोघांचेही स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. सिंधूने पोर्नपावी चोचुवाँगला २१-१८, २१-१५ असे नमवले. दुसऱ्या गेमध्ये सिंधू एक वेळ ९-११ अशी पिछाडीवर होती. परंतु अनुभवाच्या बळावर तिने जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या पोर्नपावीवर सरशी साधली. श्रीकांतला हाँगकाँगच्या एनजी लाँग अँगुसने १२-२१, २१-१८, २१-१९ असे तीन गेममध्ये पराभूत केले. हा सामना एक तास आणि पाच मिनिटांपर्यंत रंगला. प्रत्येक गटातून पहिल्या दोघांनाच उपांत्य फेरी गाठण्याची संधी असून सिंधूला तीन सामन्यांत फक्त एकच विजय मिळवता आला, तर श्रीकांतला मात्र त्याच्या गटात अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले.
चिराग-सात्त्विकला मॅथिआस यांचे मार्गदर्शन
नवी दिल्ली : भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी चिराग शेट्टी आणि सात्त्विक साइराज रंकीरेड्डी यांना डेन्मार्कचे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते मथिआस बो मार्गदर्शन करणार आहेत. आगामी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने हा करार करण्यात आला असल्याची माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) शुक्रवारी दिली. बो यांनी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले होते. चिराग-सात्त्विकव्यतिरिक्त मिश्र तसेच महिला दुहेरीतील जोडय़ांनासुद्धा बो मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2021 12:17 am