मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भाजपा खासदार माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, इरफान पठाण यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी मुस्लीम नागरिकांना ईद या सणाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या करोनाच्या तडाख्यामुळे देशभरात लॉकडाउनची स्थिती आहे. मोठ्या संख्येने एकत्र जमणे किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे यास सध्या बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व जण आपल्या घरी सुरक्षित राहून ईद साजरी करत आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंनी ट्विटरच्या माध्यमातून मुस्लीम जनतेला ‘ईद मुबारक’ म्हटले आहे.

साऱ्यांना ईदच्या शुभेच्छा! घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश सचिनने सर्व जनतेला दिला. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोत तो वडिलांच्या कोटाच्या खिशात काहीतरी शोधत आहे. या फोटोबाबत लिहिताना त्याने म्हटले आहे, “सगळ्यांना ईद मुबारक! दरवर्षी ईदच्या दिवशी मी या गोष्टीची (ईद च्या दिवशी मिळणाऱ्या ईदीची) वाट पाहत असतो. युसूफ, तू यायच्या आधी मी वडिलांकडून सगळी ईदी माझ्या खिशात घेऊन टाकली आहे.”

याशिवाय, तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाण, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि युवराज सिंग, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इत्यादी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, सध्या क्रिकेट स्पर्धा करोनामुळे बंद आहेत. सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा IPL देखील अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे. टी २० क्रिकेट विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये नियोजत आहे. पण तोदेखील रद्द होण्याची चिन्हे आहेत. जर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रद्द झाली, तर त्या जागी IPL खेळवण्याचा विचार BCCI कडून सुरू आहे. मात्र अद्याप कोणत्याही गोष्टींची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आणखी काही दिवस तरी क्रिकेटपटूंना घरातच बसावे लागणार असल्याचे दिसत आहे.