भारतीय नेमबाजांनी बुधवारी आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आठ पदकांची कमाई केली. मात्र भारताला ऑलिम्पिकच्या तीन जागांनी थोडक्यात हुलकावणी दिली.

भारताने आतापर्यंत या स्पर्धेत चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्यपदके पटकावली आहेत. पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात कायनन चेनाय याने पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावले, पण अंतिम फेरीत त्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कायनन, मानवजीत सिंग संधू आणि पृथ्वीराज यांच्या भारतीय संघाने ३५७ गुणांची कमाई करत भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनिश भानवाला याने निराशा केल्यामुळे भारताला चारपैकी एकही ऑलिम्पिकचे स्थान मिळवता आले नाही. अनिश, भावेश शेखावत आणि आदर्श सिंग यांनी भारताला १७१६गुणांसह सांघिक कांस्यपदक मिळवून दिले.

कनिष्ठ मुले आणि मुलींच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली. नीरज कुमार, आबिद अली खान आणि हर्षराजसिंहजी गोहिल यांनी भारताला १८४५ गुणांसह सुवर्णपदक मिळवून दिले. नीरजने ६१६.३ गुणांसह वैयक्तिक रौप्यपदक तर आबिदने ६१४.४ गुणांसह कांस्यपदक पटकावले. मुलींमध्ये निश्चल, भक्ती खामकर आणि किन्नरी कोनार यांनी भारताला १८३६.३ गुणांसह दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. निश्चल आणि भक्ती यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली.