विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

भारताची उदयोन्मुख नेमबाज ईलाव्हेनिल व्हालारिव्हन हिने गुरुवारी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले, परंतु ऑलिम्पिक स्पर्धेचे स्थान निश्चित करण्यात ती अपयशी ठरली आहे.

२० वर्षीय ईलाव्हेनिलने २५१.७ इतके गुण कमावले, तर ब्रिटनच्या सीओनैड मॅकिन्टोश (२५०.६) आणि चायनीज तैपईच्या यिंग लिन (२४९.५) यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ईलाव्हेनिलचे हे वरिष्ठ गटातील पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.

ऑलिम्पिकसाठी एका देशाच्या दोनच खेळाडूंना थेट संधी मिळवण्याची अनुमती असून भारताच्या अंजुम मुदगिल आणि अपूर्वी चंडेला यांनी गतवर्षीच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. टोक्यो येथे पुढील वर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे.

ईलाव्हेनिलने सुवर्णपदक पटकावले असले तरी भारताच्या अंजुमला या फेरीत १६६.८ गुणांसह सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले, तर चंडेला पात्रता फेरीत ११व्या स्थानी राहिल्याने ती अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली.

विश्वचषकात सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने मी फार आनंदी असून माझे सल्लागार गगन नारंग आणि अन्य सर्व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले. भविष्यात होणाऱ्या स्पर्धासाठी हे यश मला प्रेरणा देईल.

– ईलाव्हेनिल व्हालारिव्हन