नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारतीय नेमबाज इलाव्हेनिल वालारिवान हिने आभासी पद्धतीने झालेल्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शाहू तुषार मानेने रौप्यपदकाची कमाई केली.

बांगलादेश नेमबाजी महासंघातर्फे झालेल्या या स्पर्धेत सहा देशांच्या नेमबाजांनी भाग घेतला होता. ६० वेळा वेध घेणाऱ्या या स्पर्धेत इलाव्हेनिल हिने ६२७.५ गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त के ले. शिओरी हिराटा हिने ६२२.६ गुणांसह रौप्यपदक तर इंडोनेशियाच्या विद्या तोय्यिबा हिने ६२१.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

पुरुषांच्या प्रकारात जपानच्या नाओया ओकाडा याने ६३०.९ गुणांनिशी सुवर्णपदकावर नाव कोरले. शाहूने ६२३.८ गुणांसह रौप्यपदक पटकावले. बांगलादेशच्या बाकी अब्दुल्ला याने ६१७.३ गुणांसह कांस्यपदक प्राप्त के ले. इलाव्हेनिल परीक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी न झाल्याने या स्पर्धेत खेळू शकली. शाहूला राष्ट्रीय क्रमवारीनुसार या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.