भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या निवडणुकीसाठी गेहलोत यांचा पुत्र तेजस्वी सिंह यांचा अर्ज

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या निवडणुकीत रिंगणाबाहेर राहण्याचेच धोरण महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने ठरवले आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अजित पवार किंवा सरचिटणीसपदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता फोल ठरली. या निवडणुकीसाठी १४ जागांकरिता १९ जण रिंगणात असून, राजस्थानकडून जनार्दनसिंह गेहलोत यांचे पुत्र तेजस्वी सिंह यांनीसुद्धा अर्ज केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या १५ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीचा प्रशासक एस. पी. गर्ग (निवृत्त न्यायमूर्ती) यांनी ‘पहिल्या फेरीची निवडणूक’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ही निवडणूक ही फक्त रंगीत तालीम असून, त्यानंतर तीन महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीत निवडून आलेले पदाधिकारीच संघटनेची सूत्रे चालवतील. त्यामुळे या अल्पमुदतीच्या निवडणुकीसाठी न लढण्याचा धोरण महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने घेतल्याचे समजते आहे.

याचप्रमाणे राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी अन्य राज्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे भारतीय हौशी कबड्डी संघटनेवरील जनार्दनसिंह गेहलोत यांचा अद्याप अंकुश असल्याचेच चित्र स्पष्ट होत होते. गेहलोत यांची पत्नी मृदुल भदोरिया यांच्या अध्यक्षपदासह महासंघची संपूर्ण कार्यकारिणी समिती दिल्ली उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती. पण मुलगा तेजस्वीसह आपल्या विश्वासू प्रशासकांची सत्ता यावी, यासाठी गेहलोत प्रयत्नशील आहेत. ही निवडणूक लढणे महाराष्ट्रासाठी जोखमीचे ठरेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केल्यामुळे पवार आणि पाटील या महाराष्ट्राच्या दोन्ही प्रतिनिधींनी निवडणुकीपासून दूर राहण्याचे ठरवले आहे.

अल्पमुदतीची निवडणूक

प्रशासकांना घटनादुरुस्तीचा अधिकार नसतो. त्यामुळे २०११च्या क्रीडा संहितेची अंमलबजावणी आणि नव्या घटनेनुसार तीन महिन्यांत निवडणूक घेण्याकरिता कार्यकारिणी समिती अस्तित्वात असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीला नवी दिल्लीच्या ईरॉस हॉटेलमध्ये होणारी निवडणूक ही अल्पमुदतीची ठरणार आहे.